पावसात महापालिकाच मदतीला धावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - शहरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या ठिकाणी आज महापालिकेने विशेष मोहीम राबवत जोरदार मदतकार्य केले. अग्निशमन दलाने पाण्यात अडकलेल्या ११ जणांचा जीव वाचविला. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान रात्रभर मदतकार्यात मग्न होते. ही मोहीम आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य, पवडी व अग्निशमन विभागाचे ४५० कर्मचारी यांनी पार पाडली.

कोल्हापूर - शहरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या ठिकाणी आज महापालिकेने विशेष मोहीम राबवत जोरदार मदतकार्य केले. अग्निशमन दलाने पाण्यात अडकलेल्या ११ जणांचा जीव वाचविला. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान रात्रभर मदतकार्यात मग्न होते. ही मोहीम आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य, पवडी व अग्निशमन विभागाचे ४५० कर्मचारी यांनी पार पाडली. मोहिमेसाठी १ क्रेन, ४ जेसीबी, १२ डंपर इत्यादी यंत्रणा पुरविण्यात आली होती.

अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक उपनगरांतील घरांत पाणी शिरले होते. पाण्याच्या प्रवाहाने नाल्यात वाहून गेलेली अनेक वाहने बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाने केले. अनेक वाहने वाहून नाल्यामध्ये अडकली. काही ठिकाणी भिंती खचल्या. झाडे पडली. पाणी तुंबून राहिले. रस्त्याच्या कडेचा भराव वाहून गेला. या ठिकाणी महापालिकेच्या अग्निशमन, आरोग्य व पवडी विभागाच्या संयुक्त सहकार्याने तातडीने विशेष मोहीम राबवून परिस्थिती पूर्ववत आणण्यात यश मिळविले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

गांधी मैदान कार्यालय 
प्र. क्र. ६७ रामानंदनगर व ७८ रायगड कॉलनी, बाबा जरगनगरमधील मल्हार कॉलनी, आशियाना कॉलनी, जरगनगर कमान ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावरील पुलाचा भाग खचल्याने त्या ठिकाणी बॅरिकेडस्‌ लावण्यात आले. तसेच पडलेली कंपाऊंड वॉल काढली. प्र. क्र. ७० राजलक्ष्मीनगरमधील शाम सोसायटीजवळ साठलेल्या पाण्याची निर्गत केली. तसेच ओढ्यामध्ये वाहून गेलेला कंटेनर बाहेर काढला. रस्त्यावर पसरलेला गाळ व खडी काढली. शुश्रूषानगर व राजलक्ष्मीनगर येथे रस्त्यामध्ये साचलेले पाणी चाच मारून गाळ काढण्यात आला. प्र. क्र. ७३ फुलेवाडी रिंगरोड भागामधील डायना टाऊनजवळ अपार्टमेंट व शिवशक्तीनगर येथील कंपाऊंड वॉल काढून पाण्याचा निचरा केला. प्रभाग क्र. ७६ साळोखेनगर येथील संभाजी विद्यालयालगत पुलाचा भराव खचल्याने रस्त्याचा धोकादायक भाग, नारळाच्या धोकादायक फांद्या छाटून रस्ता वाहतूकीस खुला केला.

शिवाजी मार्केट कार्यालय
शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनी या ठिकाणी लहान पुलाजवळ पाणी तुंबल्याने परिसरातील ओढ्यांतील पाणी जवळच्या इमारतीमध्ये शिरले. ५ ते ६ फूट पाण्यात वाहनेही वाहून गेली. या ठिकाणी ओढ्यातील गाळ जेसीबीने काढून पाण्याचा निचरा केला. तसेच पुलाजवळील वाहून गेलेला भराव मुरमाने भरून घेऊन रस्ता वाहतुकीस खुला केला. हुतात्मा पार्क, वाय. पी. पोवारनगर येथील औद्योगिक वसाहतीतील चार कारखान्यांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते. यशवंत आयर्न कारखान्याची ४० फूट लांबीची दगडी भिंत ढासळली होती. येथेही पाण्याची निर्गत करण्यात आली. मंडलिक वसाहतीत सम्राट कॉम्प्लेक्‍स येथे १० घरांमध्ये पाणी शिरले. यल्लम्मा देवालयाजवळ पुलावर पाणी आल्याने दोन दुकानांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणचे पाणी निर्गतीची व्यवस्था ठेवून साफसफाई करण्यात आली. लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील साचलेले पाणी निर्गत केले. 

राजारामपुरी विभागीय कार्यालय
प्र. क्र. ६३-  सम्राटनगर, सरनाईक माळ परिसरात नाला तुंबून घरांत पाणी शिरले होते. येथे पश्‍चिम बाजूस अपार्टमेंटचे बांधकाम झाल्याने येथे नाल्यावर स्लॅब टाकल्याने पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले. नगरसेविका जयश्री जाधव यांनी हे निदर्शनास आणून दिले. 

ताराराणी चौक कार्यालय
हायवे ओपन स्पेस उद्यान, रुईकर कॉलनी, सैनिक उद्यान, मुक्त सैनिक वसाहत, अय्यप्पा स्वामी मंदिर, लक्ष्मीनारायणनगर, विचारे माळ मेन रोड, धान्य गोडावून, रमणमळा, कनाननगर ते वायल्डर मेमोरियल चर्च येथे साचलेले पाणी आरोग्य विभागाने निर्गत केले. आवश्‍यक ठिकाणी जेसीबीद्वारे चाच मारून पाणी निर्गत करण्यात आले. 

अग्निशमन दल धावले मदतीला
अग्निशमन विभागाकडून आर. के. नगर, शास्त्रीनगर, रामानंदनगर, जरगनगर, पाचगाव रोड, तुळजाभवानी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, देवकर पाणंद, गंगाई लॉन, फुलेवाडी रिंग रोड, सरनाईक कॉलनी, गोमती नाला व जयंती नाला या ठिकाणी मध्यरात्री पावसाचे पाणी इमारतीच्या बेसमेंटमध्ये व घरांमध्ये शिरल्याने अडकलेल्या ११ नागरिकांना अग्निशमनच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलविले. यात राजोपाध्येनगरमधील सहाजण यांच्यामध्ये विजय पाटील यांच्यासह त्यांचे आई-वडील व तीन मुलांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले, शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनीतील घाटगे कुटुंबीयांतील ३ जणांना इनर आणि दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. तर देवकर पाणंद येथील रेखा भोसले, राजेंद्र भोसले यांनाही पाण्याबाहेर सुखरूप काढले. देवकर पाणंद येथील सुखशांती अपार्टमेंटमधील तळमजल्यात साठलेल्या पाण्यात अडकलेली वाहने अथक प्रयत्नातून बाहेर काढली. तसेच शास्त्रीनगर येथे बोलेरो जीप, एक रिक्षा, एक कार व जरगरनगर येथे २ चारचाकी वाहने वाहून ओढ्यात गेली होती. ती क्रेनच्या साह्याने बाहेर काढली. बेसमेंटमधील पाणी पंपाद्वारे बाहेर काढले.

Web Title: kolhapur news municipal help in rain