शतकोटी वृक्ष लागवडीसाठी नऊ लाख खड्डे तयार 

शतकोटी वृक्ष लागवडीसाठी नऊ लाख खड्डे तयार 

कोल्हापूर - आज मनापासून लावलेलं झाड भविष्यात गर्द सावली देईल. पान, फूल, फळ पक्ष्यांचे आश्रयस्थान बनतील. त्यांच्या किलबिलाटात मुलाबाळांना झाडांच्या सावलीत खेळता बागडता येईल, अशा विचाराने अनेकजण शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. 

व्यक्ती, संस्थांच्या सामुदायिक प्रयत्नांतून जिल्हाभरात जवळपास 9 लाख 400 हून अधिक खड्डे वृक्ष लागवडीसाठी तयार झाले आहेत. येत्या दहा दिवसांत तितक्‍याच वृक्षांची लागवड होणार आहे. लागवडीपाठोपाठ त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तितक्‍याच नेटाने निभावण्यासाठी नियोजनाची आवश्‍यकता आहे. 

वन विभागाच्या सहयोगाने जिल्हा प्रशासन वृक्ष लागवड मोहीम राबवित आहे. त्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था, तसेच स्वयंसेवी संस्था, संघटना अशा सर्व घटकांच्या सहभागाने मोकळ्या जागी वृक्ष लागवड करता येणार आहे. प्रत्येक व्यक्तीने एक तरी रोप लावावे, जगवावे यासाठी शासनाकडून जनजागृती सुरू आहे. त्यासाठी वन विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन नोंदणीलाही जिल्हाभरातून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ज्या संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले आहेत, त्यांची नोंदणी विभागात झाली आहे. 

जिल्हाभरात 8 लाख 300 झाडे लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाला आहे. मात्र, प्रत्यक्ष या उद्दिष्टापेक्षा अधिक खड्डे खणले गेले आहेत, तर वन विभागाने वृक्ष लागवडीसाठी खासगी व शासकीय स्तरावर वृक्षवाटपही सुरू केले आहे. यात जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनाही प्रत्येकी 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी येत्या 4 ते 10 जुलै या कालावधीत विविध मान्यवरांच्या हस्ते किंवा व्यक्तिगत पातळीवर वृक्षारोपण करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात वृक्ष लागवड होईल. ज्या संस्थेने लागवड केली, त्याच संस्थेने वृक्षांची देखभाल करून ती वाढवायची आहेत. त्यासाठी वन विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. दर दोन महिन्याने वन विभाग कर्मचाऱ्यांमार्फत या जगलेल्या झाडांची माहिती घेतली जाणार आहे. त्यातून झाडे वाढतील याची दक्षता घेण्यात येणार आहे. 

तालुक्‍याला 90 हजार झाडे 
प्रत्येक तालुक्‍याला 90 हजारपेक्षा अधिक झाडे दिली जाणार आहेत. ही अशी झाडे खासगी व्यक्ती, संस्थांनाही खरेदी करता येणार आहेत. 8 रुपयाला एक याप्रमाणे ती दिली जात आहेत. प्रत्येक तालुक्‍यातील जमिनीचा पोत, भौगोलिक स्थिती, पाण्याची उपलब्धता, त्या वातावरणात कोणते झाड जास्त चांगले जगू शकेल, याचा अंदाज घेऊन झाडे पुरविण्यात येत आहेत. 

करवीर तालुक्‍यात 40 हजार रोप विक्री 
वन विभाग निर्सरीत विविध जातींची रोपे तयार आहेत. यात जंगली, देशी-विदेशी झाडांच्या रोपांचा समावेश आहे. अशी रोपे देण्यासाठी वन विभागाने शहरात बिंदू चौक, शिवाजी विद्यापीठासमोर, वन विभाग ताराबाई पार्क, राजारामपुरी येथे स्टॉल्स लावले आहेत. 8 रुपयाला 1 रोप दिले जात आहे. पहिल्या दोन दिवसांत करवीर तालुक्‍यात 40 हजारांवर रोपांची विक्री झाल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

रोपे अशी - 
लिंबू, जांभूळ, बेल, चाफा, पेरू, गावठी आंबा, कडूनिंब, गुलमोहर, फणस, काजू , हेळा, बहावा, खैर, करंजी, शेवगा, धावडा, जंगली आवळा, चिक्कू, बदाम, रेनट्री, बांबू, सिताफळ, याशिवाय जंगली फुले व अन्य 27 प्रकारची रोपे वन विभाग देत आहे. 

मोबाईल ऍप 
"माय प्लॅन्ट' या मोबाईल ऍपवर वृक्षारोपण करणाऱ्या व्यक्तींना नोंदणी करता येते. यात वृक्षारोपण करणाऱ्या व्यक्तीचा फोटो व नाव, पत्ता, कोणते झाड कोठे लावले त्याची नोंद करता येते. ही नोंद वन विभाग व शासनाकडे नोंदवली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com