अधिकारी कृपेने मंडळ तोट्यात, प्रवासी रस्त्यावर

शिवाजी यादव
बुधवार, 31 मे 2017

सांभाळून घेणारे त्रिकूट - मुंबईला रात्री दहानंतर गाडीच नाही

सांभाळून घेणारे त्रिकूट - मुंबईला रात्री दहानंतर गाडीच नाही

कोल्हापूर - मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मुंबईला खासगी आराम गाडीने जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा असतात, तर सुरक्षित प्रवासाचा डांगोरा पिटणाऱ्या एसटी महामंडळाकडे मात्र रात्री दहानंतर मुंबईला जाण्यासाठी गाडीच नाही, अशी स्थिती आहे. मुंबईच्या गाड्या बंद आणि पुण्याच्या मार्गावर दर अर्ध्या तासाला एक गाडी सोडली जाते. या गाड्या पुण्यातून रिकाम्या परत येतात. त्यामुळे एसटी महामंडळाला गेल्या तीन महिन्यांकाठी अंदाजे १० लाखांचा तोटा झाला आहे. शिवाय मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे. असा आंधळा कारभार संभाजीनगर आगाराच्या कर्तृत्वाने सुरू झाला आहे. तरीही विभाग नियंत्रक, वाहतूक अधिकारी, आगारप्रमुख यांच्या परस्पर सहमतीतून झालेला हा घोटाळा महामंडळाचा तोटा व प्रवाशांची गैरसोय करणारा ठरला असल्याने या प्रकरणाची चौकशी होणे आवश्‍यक आहे.

रात्री ९ ते ११ या वेळेत एसटी स्टॅंड परिसरातून खासगी आराम गाडीने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसते. या उलट स्थिती एसटीच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आहे. कोल्हापूर डेपोची रात्री दहाला एक गाडी मुंबईकडे गेली की, पुन्हा गाडीच नाही, अशी स्थिती आहे. कर्नाटक डेपोची एखादी गाडी मुंबईकडे जाते; पण तिकीट जास्त देऊन जावे लागते. मुंबई मार्गावर प्रवासी नाहीत म्हणून गाडी बंद करावी लागल्याचे हस्यास्पद कारण एसटीचे अधिकारी सांगतात.

चालकांना ओव्हरटाईम दिला जातो. जास्त ओव्हरटाईम मिळविणारे काही ठराविक चालकच आहेत. त्यांचे संबंध काही अधिकाऱ्यांशी पक्के आहेत. त्यामुळे ओव्हरटाईममधील ‘लाभदायक खुशी’ ड्युटी लावणाऱ्याच्या पदरात टाकली जाते, अशी चर्चा आहे. संभाजीनगर आगारातून गेल्या तीन महिन्यांत दिवसाला कमीत कमी ४ ते १८ गाड्या पुणे मार्गावर सोडल्या आहेत. त्याही सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत या गाड्या पुण्याला गेल्या व रात्री दोन वाजेपर्यंत परत आल्या.

वास्तविक मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्यासाठी दर तासाला, अर्ध्या तासाला गाड्या आहेत तरीही संभाजीनगरातून जादा गाड्या सोडण्याचा सपाटा लावला आहे. यात जाताना एका गाडीत २० ते ४० प्रवासी असतात. ती परत येताना अवघ्या १० ते २५ प्रवाशांवर गाडी येते. म्हणजे एका गाडीला कसाबसा गाडी खर्च निघावा एवढा महसूल मिळतो. असे गेल्या तीन महिन्यांच्या रेकॉर्डवरील तपशीलावरून दिसून येते.

येता-जाता एका गाडीचा किमान पाच हजार रुपयांचा नफा बुडाल्याचे गृहीत धरले तरी गेल्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष रोज दोन गाड्यांचे पाच हजार रुपयांप्रमाणे नुकसान झाले आहे. म्हणजे तीन महिन्यांत जवळपास १० लाख रुपयांचा महसुलाला फटका बसला आहे. वास्तविक संभाजीनगरातून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या तशाच पुढे मुंबईकडे सोडल्या असत्या तर कोल्हापुरातून बसलेले पुण्याला जाणारे प्रवासी पुण्यात उतरले असते व उर्वरित थेट मुंबईला गेले असते; पण चालकाला खूश ठेवायचे हा सर्व अट्टहास सुरू आहे. असा प्रकार गेल्या दीड वर्षापासून सुरू असून महामंडळाचा जवळपास ४० ते ५० लाखांचा महसूल बुडाल्याचा अंदाज आहे.

कागदोपत्री सर्व ‘ओके’ 
विभाग नियंत्रकांना काय माहिती पुरावायची ही बाब वाहतूक अधिकाऱ्यांच्या हाती आहे. संभाजीनगर आगारप्रमुखाने कितीही गलथान कारभार केला तरी त्यांना कसे सांभाळून घ्यायचे हेही वाहतूक अधिकाऱ्यांना माहीत आहे. नफ्यापेक्षा तोटा अधिक दिसत असला तरीही सगळा घोळ कागदोपत्री मात्र ‘ओके’ दाखविण्यात तिन्ही अधिकारी माहीर आहेत. यातून महामंडळाचे नुकसान व प्रवाशांची गैरसोय होत आहे.