चार हजारांत एकच शेतकरी ठरतो पात्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

कर्जमाफीतील निकषांचा अडसर - एका तालुक्‍यातील चित्र, जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती शक्‍य

कर्जमाफीतील निकषांचा अडसर - एका तालुक्‍यातील चित्र, जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती शक्‍य
कोल्हापूर - कर्जमाफीतील निकषानुसार करवीर तालुक्‍यातील 20 संस्थांतील सुमारे चार हजार शेतकऱ्यांची छाननी केली असता त्यात केवळ एकच शेतकरी पात्र ठरला आहे. कर्जमाफीतील जाचक निकषांचा हा परिणाम असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

राज्य शासनाने क्षेत्राची अट रद्द करून सरसकट दीड लाख रुपयांची कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर केली. 17 जून रोजी कर्जमाफी निकष निर्धारण समितीने यासाठी निकष तयार केले. या निकषांसह "छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना' नावाने शासनाचा अध्यादेश 28 जून रोजी निघाला. या अध्यादेशानुसार पात्र-अपात्र कर्जदारांची छाननी व यादी करण्याचे काम सहकार विभागाकडे सोपविण्यात आले आहे. तालुका पातळीवर उपनिबंधकांमार्फत प्रत्येक विकास सोसायटीकडून शेतकऱ्यांची यादी मागवून त्याची छाननी सुरू आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुका पातळीवर शेतकऱ्यांच्या यादीची छाननी सुरू आहे. करवीर तालुक्‍यातील 20 संस्थांतील सुमारे चार हजार शेतकऱ्यांची छाननी करण्यात आली. यात केवळ कारंडेवाडी येथील एकच शेतकरी पात्र ठरला आहे. यावरून या कर्जमाफीतील निकष किती अडचणीचे व जाचक आहेत, हे दिसून येते. हे केवळ एका तालुक्‍यातील उदाहरण आहे. याच तालुक्‍यातील अजून बऱ्याच संस्थांतील शेतकऱ्यांच्या छाननीचे काम अपूर्ण आहे, पण सर्वच तालुक्‍यात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती असेल, अशी शक्‍यता आहे.

दररोज नवा आदेश ठरतोय डोकेदुखी
कर्जमाफीसंदर्भात रोज नवीन माहिती शासनाकडून मागवली जात आहे. एक माहिती संकलित होत नाही, तोपर्यंत दुसरी माहिती मागवली जात आहे. हा प्रकार सहकार विभागात डोकेदुखी ठरत आहे. शासनाने 2012 ते 30 जून 2016 पर्यंतचेच कर्ज माफ करण्याचे आदेश दिले आहेत. पण 2012 पूर्वीचीही काही कर्जे थकीत आहेत, जिल्ह्यात अशा कर्जांची थकबाकी सुमारे 43 कोटी रुपये आहे. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले असता ही माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.