पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

कोल्हापूर - प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

कोल्हापूर - प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

जयंती तसेच दुधाळी नाल्यातील मैलायुक्त सांडपाणी काल थेट नदीत मिसळले. प्रदूषणाचा गंभीर परिणाम इचलकरंजीच्या नदीकाठच्या गावांना भोगावे लागतात. काल पर्यावरण दिनीच जयंती नाला धबधब्याप्रमाणे थेट नदीत मिसळत होता.

प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शिवसेनेनेही काल प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांना मृत मासे भेट दिले. प्रदूषणांची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी आज जयंती आणि दुधाळी नाला परिसराची पाहणी केली. जयंती नाल्याचे पंपिग स्टेशन बंद असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीत स्पष्ट झाले. जयंती व दुधाळीचे मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळले गेले.

दोन्ही ठिकाणी निर्जुतकीकरणाची प्रक्रिया बंद स्थितीत आढळून आली. दोन्ही नाल्यांमध्ये वाहता घनकचरा व भोवताली कचऱ्याचे ढीग दिसले. दुधाळी येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये यासंबंधी सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहेत.

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. मोठा पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी पंपिग स्टेशन बंद पडते. मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळते. जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे-मोठे नाले नदीत मिसळतात. जयंती नाल्याचे पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. हा अपवाद वगळता पंचगंगा नदीने प्रदूषणाचे टोक गाठले आहे. कागदोपत्री नियोजन होते मात्र प्रत्यक्ष कार्यवाहीस विलंब होत असल्याने नदी प्रदूषण काही थांबण्याच्या मार्गावर नाही. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षततेखाली समिती नेमली आहे. तीन महिन्यातून एकदा समितीची बैठक होते.

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue