कीटकनाशक फवारताना कोल्हापूरात महिन्याभरात १९ जणांना विषबाधा...

राजेश मोरे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कीटकनाशकाची फवारणी करताना जिल्ह्यातही शेतकऱ्यांना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. रासायनिक कीटकनाशके हाताळताना आवश्‍यक काळजी न घेतल्याने महिन्याभरात १९ जणांना विषबाधा झाल्याची नोंद सीपीआर चौकीत झाली. तत्काळ उपचार केल्यामुळे जीवदान देण्यात सीपीआरमधील डॉक्‍टरांना 
यश आले. 

कोल्हापूर - कीटकनाशकाची फवारणी करताना जिल्ह्यातही शेतकऱ्यांना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. रासायनिक कीटकनाशके हाताळताना आवश्‍यक काळजी न घेतल्याने महिन्याभरात १९ जणांना विषबाधा झाल्याची नोंद सीपीआर चौकीत झाली. तत्काळ उपचार केल्यामुळे जीवदान देण्यात सीपीआरमधील डॉक्‍टरांना 
यश आले. 

‘‘शेतात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना बाबा शेतात बेशुद्ध होऊन पडले. त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी घेऊन आलो बघा साहेब!...’’ अशी व्यथा सांगणारे सीपीआर चौकीत दररोज एक-दोन जण तर हमखास भेटतात. कीटकनाशक फवारताना ती नाका-तोंडावाटे शरीरात जाऊन विषबाधा झाल्याच्या निष्कर्षापर्यंत डॉक्‍टर पोहोचून उपचारास सुरुवात होते. दहा एक दिवसांपूर्वी एक मायलेक धावत सीपीआरमध्ये आले. मुलाने रुग्णवाहिकेतून बापाला स्ट्रेचरवरून थेट सीपीआरमध्ये दाखल केले.

कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी मुलगा पोलिस चौकीत आला. बाबा कीटकनाशक फवारत होते. बहुतेक त्यांच्या नाका-तोंडात गेले. त्यांना विषबाधा झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. होतील ना ते बरे? अशी विचारणा मायलेक डॉक्‍टरांकडे करत होते. प्रकृती ठीक आहे, मात्र दोन दिवस ठेवून घ्यावे लागेल, असे त्यांना सांगितले. मात्र त्या दिवसापासून दोन दिवस त्या दोघांची घालमेल सुरू होती. कारणही तसे होते. कधी नव्हे ते घरातील कर्ता पुरुषच अंथरुणावर पडला. दोन दिवसांनंतर ते बरे झाले, तसा मायलेकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. हे प्रातिनिधिक उदाहरण असले, तरी हीच परिस्थिती कीटकनाशक फवारताना विषबाधा झालेल्या नातेवाईकांची असते. अशा पद्धतीचे रुग्ण तीन महिन्यांपासून सीपीआरमध्ये दर महिन्याला दाखल होण्याचे प्रमाण सरासरी १० ते २० इतके आहे. 

रासायनिक खतांच्या वाढत्या वापराबरोबर कीटकनाशकांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात होऊ लागला. अशा कीटकनाशकात घातक रासायनिक घटकांचा समावेश असतो. अशा कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यास विषबाधा होते. आवश्‍यक काळजी घेतल्यानंतर विषबाधा टाळता येऊ शकते. शिक्षणाचा अभाव असणारे काही शेतकरी औषध फवारणीनंतर लगेच तंबाखूची तलफ भागवतात. हात स्वच्छ न धुता ही तलफ त्यांच्या अंगाशी येते, अशा अनेक घटना घडल्या आहेत. जर फवारणीवेळी विषबाधा झाली तर कीटकनाशकाच्या बाटलीवर त्याचे नाव, त्याचे स्वरूप आणि त्याचबरोबर पुढील उपचाराबाबतची माहितीची चिठ्ठी दिली जाते. त्याबाबतची माहिती डॉक्‍टरांना दिल्यास पुढील उपचार योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. 

ही सर्व माहिती शेतकऱ्यांनी करून घ्यावी, असे जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी सांगितले. शासन स्तरावर शेतात कीटकनाशक फवारताना कोणती काळजी घ्यावी, ती फवारण्याची पद्धत, विषबाधा झाल्यानंतर काय करावे याचे प्रबोधन कार्यक्रम राबविले जातात. 

कीटकनाशक फवारताना हतात ग्लोज, नाकाला मास्क आणि अंगात ॲप्रन वापरला पाहिजे. फवारणीनंतर साबणाने स्वच्छ हात धुणेही गरजेचे आहे. याबाबत शेतकऱ्यांच्यात प्रबोधनाचा उपक्रम विभागातर्फे राबविला जातो. नुकताच पन्हाळा, शाहूवाडी येथे हा उपक्रम राबविला.
- बसवराज मास्तोळी, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

 

Web Title: kolhapur news pesticide spraying 19 people poisoned