प्लास्टिकने तुंबल्‍या कोल्हापूर शहरातल्या गटारी

डॅनियल काळे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  भाजीपाला, फळे, औषधे, बाजार, बेकरी उत्पादने, मटण काहीही आणायचे झाले, तरी हल्ली प्लास्टिक पिशवीचाच सर्रास वापर केला जातो; पण प्लास्टिक पिशवी घातक ठरते, याचा अनुभव या पावसाळ्यात शहरवासीयांना आला. प्लास्टिकबरोबरच सॅनिटरी नॅपकीन, हगीज, थर्माकोल, पाण्याच्या बाटल्या यामुळे शहरातील गटारी, नाले, ड्रेनेजलाईन हे सर्वच तुंबले. जणू शहरच तुंबल्यासारखी स्थिती होती.

कोल्हापूर -  भाजीपाला, फळे, औषधे, बाजार, बेकरी उत्पादने, मटण काहीही आणायचे झाले, तरी हल्ली प्लास्टिक पिशवीचाच सर्रास वापर केला जातो; पण प्लास्टिक पिशवी घातक ठरते, याचा अनुभव या पावसाळ्यात शहरवासीयांना आला. प्लास्टिकबरोबरच सॅनिटरी नॅपकीन, हगीज, थर्माकोल, पाण्याच्या बाटल्या यामुळे शहरातील गटारी, नाले, ड्रेनेजलाईन हे सर्वच तुंबले. जणू शहरच तुंबल्यासारखी स्थिती होती.

महापालिका याला नक्कीच जबाबदार आहे; पण महापालिकेबरोबरच शहरातील प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. हा प्लास्टिकचा अतिवापरच कधी तरी गोरगरिबांचे संसार पाण्यात वाहून नेण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे याला दोषी कोण, महापालिका की तुम्ही-आम्ही? याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक मेसेज व्हायरल झाला. 

या मेसेजमध्येही नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात म्हटले आहे, की तुम्ही खाद्यपदार्थांचे वेष्टण, प्लास्टिक प्लेट आणि चमचे ट्रेनच्या खिडकीतून बाहेर फेकता, जे कधी नष्ट होत नाही. रेल्वे ट्रॅकच्या ड्रेनेजमध्ये ते अडकून राहते. त्यामुळे पाणी तुंबते आणि ट्रेन बंद होतात. याला जबाबदार कोण, महापालिका की तुम्ही..?

सॅनिटरी नॅपकीन
तुम्ही तुमचे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन, प्लास्टिक पिशवी, वस्तू कचराकुंडीत न टाकता थेट टॉयलेटमधून फ्लश करून देता, ज्यामुळे पाईपलाईनच ब्लॉक होते. आता दोषी कोण? कचरा वर्गीकरण न करताच कोंडाळ्यात किंवा रस्त्यावर तसाच फेकून दिला जातो. हा कचराच गटार, नाल्यात अडकतो. महापालिका कर्मचाऱ्यांनी कितीही साफ केले, तरी पुन्हा हीच स्थिती असते. त्यामुळे गटारी तुंबल्या आणि धो-धो पाऊस झाला तर पाणी घरात शिरण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही.

पाण्याची बाटली
हल्ली सर्रास लोक पाण्याची बाटली घेतात. पुनर्वापर करणाऱ्या बाटलीऐवजी प्रत्येक वेळी प्लास्टिकची नवी बाटली घेतली जाते. पाणी संपले की बाटली फेकून दिली जाते. अशा रिकाम्या बाटल्या गटारीच्या तोंडाला जाऊन अडकून बसतात. यामुळेही गटारे, नाले मोठ्या प्रमाणात तुंबले आहेत.

बाजारालाही प्लास्टिक पिशवी
बाजाराला जाताना अनेक नागरिक कापडी पिशवीऐवजी प्लास्टिक पिशवीचाच वापर करतात. विक्रेत्याने पिशवी दिली नाही, तर बऱ्याचदा वादावादी करून ही पिशवी मिळविली जाते. घरात भाजीपाला व इतर बाजार नेल्यानंतर या प्लास्टिक पिशव्या गटारात फेकून दिल्या जातात.

प्लास्टिकचेच कारण 
शहरातील गटारी, ड्रेनेजलाईन, नाले तुंबण्यात हे सॅनिटरी नॅपकीन, प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, प्लास्टिकच्या बाटल्या हेच महत्त्वाचे घटक आहेत. ८० टक्के ठिकाणी याच कारणांनी गटारे, नाले तुंबतात. त्यामुळे शहरवासीयांनी एकदा प्लास्टिकच्या वापराबद्दल विचार करायला हवा. ऊठसूट प्लास्टिक वापराऐवजी पुनर्वापर करणाऱ्या कापडी पिशव्या, पुनर्वापर होऊ शकणाऱ्या काचेच्या बाटल्या आदींचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. मटणाच्या दुकानातही प्लास्टिक पिशवीऐवजी नागरिकांनी डबे घेऊन जायला हवेत.