पोलिस कम्प्लेंट ऑथॉरिटीमुळे तक्रार करणे सोपे

पोलिस
पोलिस

कोल्हापूर - एखाद्या गुन्ह्यात संशयित म्हणून एखाद्याला ताब्यात घेण्याचा पोलिसांना नक्कीच अधिकार आहे; पण अनेक प्रकरणांत संशयिताला ताब्यात घेतल्यावर त्याच्या कुटुंबीयांना न कळवता, त्याची कोठेही नोंद न करता, तपासासाठी त्याला फिरवत होते.

हे सारे बेकायदेशीर होते; पण कोणी दाद मागत नव्हते किंवा दाद कोठे मागायची, हे माहीत नसल्याने सारे खपून जात होते. आता मात्र पोलिस कम्प्लेंट ऑथॉरिटी कार्यरत झाल्यामुळे तक्रार करणे सोपे झाले आणि अशा तक्रारींचा ओघच लागला आहे. ‘पोलिस वर्दीच्या नावाखाली मी काहीही करू शकतो,’ ही काही पोलिस अधिकारी व पोलिसांनी निर्माण केलेली भीती कमी होण्यास याची मदत होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही ऑथॉरिटी कार्यरत झाली आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद पोतदार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. निवृत्त न्यायाधीश पी. के. जैन, अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग, निवृत्त अधिकारी रामराव, लोकप्रतिनिधी म्हणून उमाकांत मिरकर व तपास अधिकारी म्हणून रऊफ शेख, सुनील जैन, नागेश लोहार आहेत.

याशिवाय अन्य कार्यालयीन स्टाफ आहे. पोलिसांच्या अधिकाराला कोणताही धक्का लागणार नाही; पण पोलिस आपल्या अधिकाराचा गैरवापरही करणार नाहीत, अशा हेतूने महाराष्ट्र पोलिस अमेंडमेंट ॲण्ड कंटिन्युयन्स ॲक्‍ट-२०१४ मध्ये ही तरतूद करून ही ऑथॉरिटी गठित केली आहे.

यानुसार पोलिस कोठडीत संशयित आरोपीचा मृत्यू, संशयिताला झालेली मारहाण, बलात्कार, कायदेशीर बाबींची पूर्तता न करता संशयित म्हणून पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवणे, लाच मागणे, कायद्याची भीती दाखवून खंडणी वसूल करणे, जागा किंवा मालमत्तेच्या वादात बळजबरीने ताबा घेणे असा कोणताही प्रकार खरोखर काही पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी केला तर संबंधिताला केवळ एका प्रतिज्ञापत्रावर या ऑथॉरिटीकडे दाद मागता येणार आहे. मात्र खोटी तक्रार केल्याचे सिद्ध झाल्यास तक्रार करणाऱ्यावर कारवाईची यात तरतूद आहे.

काही ठराविक पोलिसांचा व काही ठराविक पोलिस अधिकाऱ्यांचा वर्दीतील मग्रुरी वावर या साऱ्या नव्या ऑथॉरिटीला कारणीभूत ठरला आहे. तपासाच्या नावाखाली कोणालाही ताब्यात घेणे, ताब्यात घेण्याची भीती दाखवणे, ताब्यात घेतल्याची स्टेशन डायरीला नोंद न करणे किंवा ज्याला ताब्यात घेतले, त्याच्या कुटुंबीयांना लगेच न कळविणे ही काही पोलिसांनी प्रथाच रूढ केली.

खासगी दोन व्यक्तींच्या वादातही काही पोलिस कोणा एकाची बाजू घेऊन उतरत आहेत, वर्दीच्या जोरावर प्रकरणे ‘मिटवण्याचा’ही प्रयत्न काहींनी केला. त्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली. सगळेच पोलिस असे करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे; पण काहीजणच असे करतात व साऱ्या पोलिस खात्याबद्दल संताप निर्माण करतात... अशा प्रवृत्तीला या ऑथॉरिटीमुळे चाप बसणार आहे.

पोलिस कम्प्लेंट ऑथॉरिटीचा पत्ता
कुपरेज एम.टी.एन.एल. एक्‍स्चेंज बिल्डिंग, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई - ४०० ०२१, फोन ०२२-२२८२००४५/४६/४७
कोकण भवन, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर येथेही ऑथॉरिटीचे कार्यालय सुरू होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com