मुश्रीफ साहेब... त्या रावणाचे नाव तरी घ्या!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

पडघम लोकसभेचे - सतेज पाटील, मुश्रीफ, मंडलिक बावड्यात एकाच व्यासपीठावर
कोल्हापूर - आमदार हसन मुश्रीफ आपला वाढदिवस राम नवमीच्या मुहूर्तावर साजरा करतात. त्यामुळे रावणाला कसे आणि कधी गाडायचे, याचे ज्ञान त्यांना असणारच आहे; परंतु ज्या रावणाला गाडायचे आहे, त्याचे नाव एकदा जाहीर करा, असा प्रश्‍न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे. 

खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे वैर सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाडिक यांनी राष्ट्रवादीपासून घेतलेली फारकत आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत खासदारांनी सोयीनुसार घेतलेली भूमिका यामुळे त्यांचे आमदार मुश्रीफ यांच्याशी खटके उडत आहेत. संधी मिळेल तिथे खासदार महाडिक यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी श्री. मुश्रीफ सोडत नाहीत. आमदार सतेज पाटील यांच्या बावड्यातील बालेकिल्ल्यात एका संस्थेच्या कार्यक्रमाचे श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे होते. सोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक उपस्थित होते. प्रा. मंडलिक यांनी लोकसभेची निवडणूक श्री. महाडिक यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी आमदार पाटील व मुश्रीफ त्यांच्या विरोधात होते; मात्र या कार्यक्रमात हे तिघेही मांडीला मांडी लावून बसले होते. यामुळे खासदार महाडिकांविरुद्ध मोट बांधण्यासाठीच तिघे एकत्र आले आहेत, असे वातावरण पाहावयास मिळाले. 

याच कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ यांनी बावड्यासारखी एकी मागे असती तर रावणाची लंका जाळली असती, असे वक्तव्य केले. एकी अशीच ठेवा आणि रावणाला गाडा, असे आवाहनही आमदार मुश्रीफ यांनी केले होते.

लंकापती कोण?
मुश्रीफ यांच्या टोलेबाजीमुळे राजकीय वर्तुळात रावण कोण या चर्चेला ऊत आला आहे. त्यामुळे आमदार श्री. मुश्रीफ यांनी आता रावण कोण, कोणाची लंका याची माहिती जाहीरच करावी, अशी चर्चा आहे. आमदार श्री. मुश्रीफ यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केल्यामुळे त्यांच्या या टोलेबाजीचा इशारा कोणाकडे आहे, याचे उत्तर आता त्यांनीच द्यावे.