महाडिक-सतेज पुन्हा आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळावरून आता आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. अधिकार नसताना श्री. महाडिक यांनी सभेत माईक हातात घेऊन विषयपत्रिकेचे वाचन केल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. हाच मुद्दा घेऊन श्री. पाटील यांनी त्यांच्यासह संघाच्या संचालकांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळावरून आता आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. अधिकार नसताना श्री. महाडिक यांनी सभेत माईक हातात घेऊन विषयपत्रिकेचे वाचन केल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. हाच मुद्दा घेऊन श्री. पाटील यांनी त्यांच्यासह संघाच्या संचालकांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

महापालिकेतील राजकारणापासून या दोघांत मतभेद निर्माण झाले आहेत. संधी मिळेल तिथे एकमेकांना शह देण्याचा प्रकार या दोघांकडून सुरू आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर श्री. महाडिक यांनी सरकारसोबत तडजोडी केल्या. त्यांचे एक पुत्र हे भाजपचे आमदार असल्याने व त्यांनी सतेज पाटील यांचाच पराभव केल्याने त्यांना चांगलेच बळ आले. त्यातून त्यांच्याकडूनही श्री. पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न अधूनमधून होत आहे. ‘गोकुळ’च्या सभेत संघाचे संचालक किंवा कर्मचारी नसताना श्री. महाडिक यांनी अहवाल दाखवून विषय मंजूर करण्याचे आवाहन करत सभा गुंडाळली. श्री. महाडिक यांच्या या कृतीने श्री. पाटील यांना त्यांच्याविरोधात रान उठवण्यासाठी आयतीच संधी मिळाली आहे. त्यांच्या या कृतीविरोधात श्री. पाटील यांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली असून, त्यातून हे दोघे पुन्हा आमनेसामने ठाकणार आहेत. 

‘महाडिक हे गोकुळचे लुटारू आहेत. आतापर्यंत ते गोकुळला लुटत राहिले,’ असा आरोप करून श्री. पाटील यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. त्यावर श्री. महाडिक यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर दिले गेले नाही; पण सर्वसाधारण सभेत श्री. महाडिक यांनी केलेल्या कृतीला एक-दोन संचालक सोडले, तर कोणाचे समर्थनही नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर बहुंताशी संचालकांनी आपल्याला हे न पटल्याचे सांगितले आहे. संचालकांचा श्री. महाडिक यांच्याविरोधात असलेला रोष या निमित्ताने पुढे आला आहे. त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न श्री. पाटील यांच्याकडून होण्याची शक्‍यता आहे. 

‘गोकुळ’ हीच महाडिक यांच्या राजकारणाची मोठी ताकद आहे. या जोरावर ते जिल्ह्यातील नेत्यांना पुरून उरले आहेत; पण अपवाद वगळता जिल्ह्यातील असा एकही नेता नाही, ज्यांनी निवडणुकीत किंवा राजकारणात श्री. महाडिक यांची मदत घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विरोधात उघड बंड आतापर्यंत कोणी केले नाही. ‘गोकुळ’मधील त्यांची सत्ता खालसा करण्याचा आमदार पाटील यांनी गेल्या वेळी प्रयत्न केला; पण ऐनवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्री. महाडिक यांना साथ दिली.

नेते लांब अन्‌ दोघांतच वाद 
दरवेळी अशीच काहीशी राजकीय परिस्थिती निर्माण होते व ती श्री. महाडिक यांना पोषक ठरते; पण त्यातूनही श्री. पाटील यांच्याकडून त्यांना आव्हान दिले जात आहे. त्यातून श्री. महाडिक यांचे विरोधक आणि समर्थक असलेले नेते लांब आणि या दोघांतच वाद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशांना महाडिक नकोत; पण उघड त्यांच्याविरोधात कोणी उभे राहत नाही. कोणी तरी का असेना श्री. महाडिक यांना आव्हान देत आहे, असे म्हणून इतर नेतेही शांत आहेत.