शिवसेना आमदारांत पोस्टर वॉर

शिवसेना आमदारांत पोस्टर वॉर

कोल्हापूर,- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आमदारांत सध्या ‘पोस्टर वॉर’ रंगले आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यात आपली वर्णी लागावी, यासाठी चढाओढ सुरू आहे.

ठाकरे शुक्रवारी (ता. २४) दौऱ्यावर येत आहेत. बेळगावहून त्यांचे कोल्हापुरात आगमन होईल. उचगाव येथे दुपारी कार्यक्रम आटोपून  सायंकाळी ते कुडित्रे येथे शेतकरी मेळाव्यासाठी रवाना होतील. आमदार चंद्रदीप नरके यांनी मेळावा आयोजिला आहे. या निमित्ताने नरके यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. पोस्टरद्वारे ठाकरे यांच्या स्वागताचे फलक पंचक्रोशीत झळकले आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरात मोठे डिजिटल बोर्ड उभारले असून, त्यांचा वाढदिवस याच दिवशी असल्याने शक्तिप्रदर्शन आणि वाढदिवस असा योग साधला आहे. उद्धव ठाकरे याच दिवशी रात्री आठ वाजता शनिवार पेठेतील क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ज्या वेळी चर्चा झाली, त्या वेळी कोल्हापुरातून नेमक्‍या सहा आमदारांपैकी कुणाला संधी मिळणार, याची चर्चा झाली. तीन वर्षांत अनेकवेळा नावे पुढे आली; पण संधी काही मिळाली नाही. ठाकरे ज्या ज्या वेळी दौऱ्यावर येतात, त्या वेळी त्यांना जिल्ह्यातील सहा आमदार शिवसेनेचे असल्याचे आठवण करून दिली जाते. 

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास आपल्यालाच संधी मिळावी यासाठी आमदारांत चुरस आहे. प्रामुख्याने नरके, क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावांची नेहमी चर्चा होते. तिघांचीही आमदारकीची दुसरी टर्म आहे. २०१९ ला काय होईल हे सांगता येत नसल्याने उर्वरित कालावधीसाठी किमान राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली तरी बरे होईल, या हेतूने नरके आणि क्षीरसागर यांच्यात स्पर्धा सुरू आहे. स्वागताचे बोर्ड तुमचे अधिक का आमचे, अशी ईर्षा लागली आहे. करवीर तालुक्‍याचा काही भाग आणि शहराचे चौक स्वागत बोर्डाने व्यापले आहेत. 

ठरावीक जणच नेहमी चर्चेत...
विस्तारात स्थान मिळेल की नाही? उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमके काय आहे, याचा अंदाज नसताना आमदार मंडळींनी मात्र शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. जिल्ह्या दहा पैकी शिवसेनेचे सहा आमदार आहेत. नरके, मिणचेकर, क्षीरसागर यांच्यासह सत्यजित पाटील, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. यातील ठरावीक जणच नेहमी चर्चेत असतात. मात्र, आयत्यावेळी जे चर्चेत नाहीत, त्यांना संधी मिळाली की शक्तिप्रदर्शन करणाऱ्यांची पंचाईत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com