जमीन अजूनही तहानलेलीच

सुनील पाटील
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात धो-धो पाऊस पडला. जेवढा पडला तेवढ्यातच धरण भरले; मात्र संततधार पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील जमिनीची तहान अजून भागलेली नाही. त्यामुळे धरणे जरी भरली असली, तरीही भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हेच यावरून स्पष्ट होत आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्यात धो-धो पाऊस पडला. जेवढा पडला तेवढ्यातच धरण भरले; मात्र संततधार पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील जमिनीची तहान अजून भागलेली नाही. त्यामुळे धरणे जरी भरली असली, तरीही भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हेच यावरून स्पष्ट होत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. जूनच्या सुरवातीला सुरू होऊन, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत उघडायचे नाव न घेणारा पाऊस गेल्या तीन ते चार वर्षांपासून कमी होत आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे धरण भरल्याचे समाधान मिळते; पण हेच पाणी वर्षभर पुरेल हे आताच सांगणे धाडसाचे होत आहे. चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात ओढे, नाले, शेती पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होती. आता हे चित्र क्वचितच पाहायला मिळत आहे. अपेक्षित आणि जोरदार वृष्टी होत नसल्याने जमिनीची तहान अजूनही भागलेली नाही.  

जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी जून महिन्यात १५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या चार वर्षांत यामध्ये ५० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

यावर्षी, जून २०१७ पासून आतापर्यंत केवळ ८५० मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा ५४ टक्‍के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी २ लाख ६९ हजार २७४ हेक्‍टरवर भात, भुईमूग, सोयाबीनची पेरणी झाली आहे. या पिकांवरही कमी पावसाचा परिणाम झाला आहे. 

काटकसर हवीच
यंदा सरासरी ४० टक्के उत्पादन घटणार आहे. याउलट जमिनीची तहान न भागल्यामुळे विहीर, कूपनलिकांना पाणी कमी पडण्याची शक्‍यता आहे. मुबलक पावसाअभावी जमिनीत मुरणारे पाणीही कमी झाल्याने ही परिस्थिती ओढवणार असल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा लागणार आहे.