विमानतळास राजाराम महाराजांचे नाव

विमानतळास राजाराम महाराजांचे नाव

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास ‘छत्रपती राजाराम महाराज, कोल्हापूर विमानतळ’ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनेक वर्षांपासूनची कोल्हापूरवासीयांची ही मागणी होती. त्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. विविध संघटनांनीही ही मागणी लावून धरली होती. पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराने नाव देण्याचा हा ठराव मंत्रिमंडळात करण्यात आला. आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत त्याची मंजुरी घेण्यात येईल आणि अंतिम मंजुरीसाठी हा ठराव केंद्राकडे पाठवण्यात येईल.

कोल्हापूर संस्थानमध्ये दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने व्यापारवाढीसाठी विमानतळ असावे, या हेतूने छत्रपती राजाराम महाराजांनी प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराजांनी रेल्वे सुरू करून दळणवळण सेवा वाढविली. तोच वारसा घेऊन छत्रपती राजाराम महाराजांनी विमानसेवेचा पाया रचला. १९३०-३५ या कालावधीत विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमीन विमानतळासाठी संपादित केली. 

विमानतळाचे उद्‌घाटन ४ मे १९४० ला छत्रपती राजाराम महाराजांच्याच हस्ते झाले. १९७८-७९ ला विमानतळाचे विस्तारीकरण झाले. उद्योगनगरी म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापूरला खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर नेण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यातील उद्योग, शेती क्षेत्राचा विकास साधता आला. छत्रपती राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. ज्या पद्धतीने रेल्वे सेवा सुरू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे नाव रेल्वे स्थानकाला देण्यात आले, त्याच पद्धतीने विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव मिळावे म्हणून विविध संघटनांनी आंदोलन करून ही मागणी लावून धरली होती. अनेक वर्षे त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावाही करण्यात येत होता; परंतु त्यात यश आले नव्हते. महिन्यापूर्वी विमानतळ सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या, त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज मंत्रिमंडळात हा ठराव करण्यात आला. 

राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल भारतीय जनता पक्षानेच घेऊन त्यांचा योग्य सन्मान केला आहे. केंद्रात भाजप सरकार असताना कोल्हापूर रेल्वे स्थानकास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आणि आता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळेच छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्याची दखल घेत विमानतळास नाव देण्याचा ठराव करण्यात आला. लवकरच केंद्राकडूनही त्यासाठी मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करू. कोल्हापूरसाठी ही अभिमानाची बाब आहे.
- चंद्रकांत पाटील, 

पालकमंत्री तथा महसूलमंत्री

प्रतिष्ठानच्या आंदोलनाचे यश
कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा आदेश प्राप्त झाला. हे छत्रपती राजाराम महाराज प्रतिष्ठापनाने केलेल्या आंदोलनाचे यश आहे, असे पत्रक संस्थेचे अध्यक्ष रहिम सनदी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. प्रतिष्ठानकडून गेली अनेक वर्षे त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदने दिली होती. विमानतळावर महाराजांच्या नावाचे फलक लावले होते. त्यासाठी कार्यकर्त्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल होते. शासनाने दिलेल्या आदेशामुळे प्रतिष्ठानच्या आंदोलनाला यश आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

नियमित उड्डाण व्हावे हीच अपेक्षा...!
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने विमानसेवा पूर्ववत सुरू होईल, असे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी मान्य झाली. आज राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णयही झाला. आता विमानाचे येथून नियमित उड्डाण होत राहिले तर ते छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाला साजेसे ठरेल.

कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करून राज्य सरकारचे आभार मानतो. ज्या छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरची विमानसेवा सुरू केली, त्यांचेच नाव कोल्हापूर विमानतळाला देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या जनभावनेचा विजय आहे. राजारामपुरी परिसरातील अनेक संघटना-तरुण मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्स यांनी याप्रश्‍नी पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत कृतिशील पाऊल उचलले आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर विमानतळावरून नियमित आणि व्यापक विमानसेवा सुरू होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
- धनंजय महाडिक
, खासदार

कोल्हापुरात पहिले विमानतळ राजाराम महाराजांनीच सुरू केले होते. राज्य सरकारने सध्याच्या कोल्हापूर विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला, तो स्वागतार्हच आहे. राजाराम महाराज यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने हे पाऊल टाकले होते. त्यांच्या योगदानाचे कोठेतरी चीज झाले, असे वाटते. विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव तर दिलेच; पण या विमानतळावरून रोज विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- संभाजीराजे छत्रपती,
खासदार 

गेल्या दहा-बारा वर्षांपासून कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, यासाठी सनदशीर मार्गाने सातत्याने आंदोलने केली. सरकारचे याकडे लक्ष वेधले. या संदर्भात महापालिका, जिल्हा परिषदांचे ठरावही झाले. त्यामुळे आपल्या आंदोलनाला यश आले आहे. आज शासनाने नाव देण्याचा निर्णय घेतला. लवकरात लवकर त्याची अंमलबजावणीही केली जावी, अशी अपेक्षा आहे.
- उदयसिंहराजे यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com