शिक्षक बदली धोरणाविरोधात आज राज्यभर मोर्चे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

कोल्हापूर - बदली धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. अन्यायकारक बदली धोरणात सुधारणा करावी, या मागणीसाठी संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर शनिवारी (ता. १७) मोर्चे काढले जाणार आहेत. निवेदने देऊन, शिष्टमंडळ भेटून तसेच न्यायालयात बदल्यांना काही काळ स्थगिती मिळवूनही शासनाच्या ग्रामविकास विभागाने शिक्षक नेत्यांना दाद न दिल्याने अखेर शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

शासनाने २७ फेब्रुवारीला शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे बदली आदेश जारी केला. 
जिल्ह्यातील शाळांची अवघड व सर्वसाधारण अशा दोन क्षेत्रांत निवड करायची व त्यानुसार या क्षेत्रात बदल्या  करण्याचे निश्‍चित केले. त्यापासून गेले साडेतीन महिने शिक्षणक्षेत्रात बदलीचा विषय बहुचर्चित झाला आहे.

बदल्यांना टक्केवारी नाही. खो पद्धतीच्या बदलीत कोणाचीही कुठेही बदली होणार असल्याने शिक्षकवर्ग हवालदिल झाला आहे. सुमारे १५ ते २५ वर्षे स्वतःच्या तालुक्‍यात नोकरी करत स्थिरस्थावर झालेल्या शिक्षकांना बदलीने दुसऱ्या तालुक्‍यात जाण्याची इच्छा नाही. त्यामुळेच सर्वसाधारण व अवघड क्षेत्रातील बदली धोरणाला विरोध होऊ लागला आहे. दुर्गम भागातील लोकांना सोयीच्या शाळेत येण्यास कोणाचाच विरोध नाही. खो पद्धतीच्या बदल्यांना विरोध आहे.

जिल्हास्तरावर बदल्या न करता मागील धोरणानुसार तालुका-जिल्हास्तरावर सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या करण्याची मागणी होत आहे.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व सचिव असिम गुप्ता यांची संघटनांनी अनेकवेळा भेट घेतली व बदली धोरणात सुधारणा करण्याची मागणी केली. परंतु केवळ प्रत्येक वेळी आश्‍वासने मिळाली. त्यामुळे अखेर राज्यातील सर्व संघटनांना एकत्र येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकावे लागले आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांचे निकालही लागलेले नाहीत. शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे.बदल्या करण्याबाबात प्रशासन ठाण आहे तर संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे बदल्यांची संभ्रामस्था वाढली आहे.

दसरा चौकातून मोर्चा
बदली धोरणाविरोधी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावरील मोर्चास दुपारी एक वाजता दसरा चौकातून सुरवात होणार आहे. शिक्षकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सर्व शिक्षक संघटनांनी केले आहे.