कोल्हापूर-राधानगरी मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

राशिवडे बुद्रुक - कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावर अनेक ठिकाणी काल मध्यरात्रीनंतर (शनिवार) दुकाने, सहकारी संस्थांची कार्यालये फोडण्याचे प्रकार घडले.

राशिवडे बुद्रुक - कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावर अनेक ठिकाणी काल मध्यरात्रीनंतर (शनिवार) दुकाने, सहकारी संस्थांची कार्यालये फोडण्याचे प्रकार घडले. यात भोगावती बाजारपेठेतील इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानातील तीन एलसीडीसह सत्तर हजारांची रोकड, कापड दुकानातील तयार कपडे व तीन हजार रुपये, एका दूध संस्थेतील वीस हजार रुपये असा सुमारे अडीच लाखांचा माल लांबवला. शिवाय आणखी दोन दुकाने फोडली, तीन फोडण्याचा प्रयत्न केला. राधानगरी तालुक्‍यातील कौलव, सिरसे, आणाजे येथील संस्थांचे दरवाजे फोडून चोरी झाली. मांगेवाडी येथील एका घरातून पन्नास हजारांचे दागिने चोरले. 

याबाबत माहिती अशी - शनिवारी (ता. 21) मध्यरात्रीनंतर रविवारच्या पहाटेपर्यंत हे सत्र सुरू होते. चोरट्यांनी वाशी परिसर व हळदी (ता. करवीर) येथेही दुकाने फोडली. हळदीतील किराणा दुकानातून काजूची बरणी घेऊन पसार झाले.

भोगावती कारखान्याच्या नव्यानेच बांधलेल्या दुकानगाळ्यांतील अभिषेक इलेक्‍ट्रॉनिक्‍स या दुकानाचे शटर उचकटले व आतील तीन एलसीडीसह सत्तर हजार रुपयांची रोकड लांबवली. शेजारी असलेल्या टायरचे दुकानही फोडले. मात्र त्यात काही सापडले नाही. बाजूचे एक मोबाईल दुकान फोडण्याचा असफल प्रयत्न झाला.

घोटवडेकडील बाजूला असलेल्या लुक्‍स गारमेंटचे शटर उचलटून रेडिमेंट कपड्यातील तीसवर पॅंटा, वीस साड्या व अन्य माल चोरला. गल्ल्यातील तीन हजार रुपयेही चोरले. येथील एका घड्याळ दुकानासह समृद्घी प्लास्टिक वस्तूंचे दुकानही फोडले. त्यातून किरकोळ साहित्य चोरले. असा भोगावतीवरून रोकडसह सुमारे दोन लाखांचा माल चोरट्यांनी लांबवला. 

याबाबत करवीर पोलिसांत नोंद झाली. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, सहायक पोलिस निरीक्षक ए. जी. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयास्पद हालचाली आढळल्या असून तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

काैलवमध्येही चोरीच्या घटना

कौलवमध्येही चोरट्यांची टोळी शिरली होती. त्यांनी गावातील गिरणीचा व विठ्ठलाई दूध संस्थेचा दरवाजा फोडून चोरीचा असफल प्रयत्न केला. सिरसे येथे शरद दूध संस्था व आणाजे येथे ईवराईदेवी दूध संस्थेतील वीस हजार रुपये लांबवले. कामधेनू दूध संस्थेचे शटर उचकटले. मात्र चोरीची आसपासच्या लोकांना चाहूल लागताच चोरट्यांनी तिथून पळ काढला.

आणाजेत चार चोरटे होते व ते दुचाकीवरून आले असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. मांगेवाडी येथील गणेश रंगराव चव्हाण यांच्या घरातही चोरी झाली. घरात कोणीच नसल्याचे पाहून या बंद घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे पन्नास हजार रुपयांचे दागिने चोरले. याची राधानगरी पोलिसांत तक्रार झाली आहे. हा तपास सहायक फौजदार टी. के. चौगले, बी. डी. पाटील, आर. आर. पाटील करत आहेत. 

काजूची बरणी नि कपडेही... 
टोळीने हे कृत्य झाल्याचे पुढे येत आहे. त्यांच्याकडून केवळ पैसे, दागिनेच नव्हे तर मिळेल त्या वस्तू लंपास केल्या जातात. हळदीतून काजूची बरणी नेली. भोगावतीतून कपडे हा प्रकारच विचित्र आहे. दोन वर्षांपूर्वीही असाच प्रकार या परिसरात झाला होता. अनेक दूध संस्थांतून दिवाळी बोनसची रोकड लांबवली होती.