संपात लुडबुड करणाऱ्या सदाभाऊंवर कारवाई - शेट्टी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कोल्हापूर - शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या संपात लुडबुड करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशारा "स्वाभिमानी'चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला. त्यांच्या या कृतीचे मीच काय पण संघटनेतील एकही कार्यकर्ता समर्थन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूर - शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या संपात लुडबुड करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशारा "स्वाभिमानी'चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला. त्यांच्या या कृतीचे मीच काय पण संघटनेतील एकही कार्यकर्ता समर्थन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचा सुरू असलेला संप, उद्या शेतकऱ्यांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद या पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संघटनेची भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविषयी विचारले असता अतिशय संतप्त भावना व्यक्त केल्या. 

शेट्टी म्हणाले, "गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेला संप दडपून टाकण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही लुडबुड केल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे. खोत यांच्या या कृतीचे मीच काय पण संघटनेतील एकही कार्यकर्ता समर्थन करणार नाही. याबाबत खोत यांना संघटनेच्या कार्यकारिणी समोर बोलून खुलासा विचारला जाईल. हा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.' 

ते म्हणाले, "माजी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी दहा वर्षे या खात्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय गुंतागुंतीचा आहे. त्याबाबत त्यांनी राजकारण बाजूला ठेवून या प्रश्‍नाकडे बघावे. या कर्जमुक्तीसाठी व भाजपला पाठिंबा दिल्याने झालेल्या पश्‍चातापाचे प्रायश्‍चित घेण्यासाठी आत्मक्‍लेश यात्रा काढली. यात्रेच्या समोराप प्रसंगी सरकारला 2 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे; पण तत्पूर्वीच शेतकऱ्यांनी संप सुरू केला आहे. अजून वेळ हाताबाहेर गेलेली नाही, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेण्यास रिकामे आहोत.' 

तुम्ही म्हणता म्हणून सत्तेत... 
तुम्ही सरकारसोबत सत्तेत आहात मग आंदोलन का? या प्रश्‍नावर शेट्टी उसळून म्हणाले, "तुम्ही म्हणता म्हणून आम्ही सत्तेत आहोत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे समर्थन केलेले नाही, त्यांच्याकडून खुलासा मागवून कारवाई करणार आहे, यावरून मी सत्तेत की सत्तेत नाही हे "स्पष्ट' बोललो आहे.'