सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलचा धमाका खुला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

तब्बल ७६ स्टॉलच्या माध्यमातून उभारलेल्या फेस्टिव्हलची मांडणी आणि नियोजन नेटके झाले. गृहोपयोगी वस्तूंसह सजावटीच्या वस्तू, सोलरसारख्या उपकरणावर भरघोस सवलत देऊन ग्राहकोपयोगी फेस्टिव्हल सुरू केल्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन..!
- डॉ. प्रशांत अमृतकर, 
शहर पोलिस उपअधीक्षक 
 

कोल्हापूर -  बदलत्या लाईफस्टाईलसह खरेदी आणि डिस्काउंटचा धमाका आज आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलच्या मैदानावर खुला झाला. ‘सकाळ’च्या दसरा शॉपिंग फेस्टिव्हल २०१७ चे उद्‌घाटन शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, मुख्य बातमीदार निखिल पंडितराव प्रमुख उपस्थित होते. महालक्ष्मी आटा चक्की, रॉनिक ग्रुप सहप्रायोजक आहेत.

बदलत्या आवडी-निवडी, नवे ट्रेंड यांचा विचार करून तब्बल ७६ स्टॉलच्या माध्यमातून ‘सकाळ’ने खरेदीचा धमाका आज सर्वांसाठी खुला केला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून फेस्टिव्हलचे उद्‌घाटन झाले. कांदा कापण्याच्या छोट्या यंत्रासह पिठाच्या चक्कीपर्यंत सर्वकाही एकाच छताखाली पाहण्याची संधी ‘सकाळ’ने दिली आहे. वॉटर सोलर, पिठाची चक्की, व्यायामाचे साहित्य, इलेक्‍ट्रिक वस्तू, घरी लागणाऱ्या छोट्या-मोठ्या वस्तू, फिश टॅंक, चवदार लोणचे, आयुर्वेदीक तेल, गृहसजावटीच्या वस्तू अशा अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा खजाना खुला झाला.

डॉ. अमृतकर यांनी स्टॉलची पाहणी केली. गृहिणींचा स्वयंपाक सोपा होण्यासाठी तयार केलेल्या वस्तूंची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य, गृहसजावटीचे स्टॉल, उंची किमतीच्या मोटारींच्या स्टॉलवर थांबून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. मारुती सुझुकी आणि हुंडाईच्या मोटारीही येथे प्रदर्शनात ठेवल्या असून, फेस्टिव्हलमध्ये बुकिंग केल्यास खास सवलत आहे.

सलग पाच दिवस सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत फेस्टिव्हल खुला राहणार आहे. प्रवेश मोफत आहे. डिस्काउंटचा धमाका येथे खुला झाला आहे. अत्याधुनिक वॉटर फिल्टरवर गॅस गिझर मोफत आहे. इओन मोटारीवर प्लेझर स्कूटर मोफत अशा धमाकेदार ऑफर फेस्टिव्हलमध्ये खुल्या झाल्या आहेत. फूड स्टॉलमध्येही खवय्यांसाठी विशेष पदार्थांची मेजवानी आहे. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांतील विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहेत. त्यामुळे फेस्टिव्हल नावीन्याने भरला आहे. दसरा शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आबालवृद्धांसाठी सर्व काही एकाच छताखाली देण्यात आले आहे.

खरेदीबरोबर सेल्फीसुद्धा...
बच्चेकंपनीसाठी फेस्टिव्हलच्या ठिकाणी आकर्षक कार्टुन ठेवण्यात आले आहेत. छोटा भीम, डोरेमॉन, मोटू-पतलू यांसारख्या कार्टुनबरोबर सेल्फी काढण्याचा आनंदही येथे घेता येणार आहे. आज पहिल्याच दिवशी कुटुंबासह आलेल्या अनेक मुलांनी सेल्फी काढून खरेदीचा आनंद द्विगुणित केला.