"समीर'च्या जामीन अर्जावर निकाल आज शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

दोन पिस्तुलांतून झाडल्या गोळ्या; ऍड. निंबाळकरांचा युक्तिवाद
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर चौघांनी दोन पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

दोन पिस्तुलांतून झाडल्या गोळ्या; ऍड. निंबाळकरांचा युक्तिवाद
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर चौघांनी दोन पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

त्यातील एक पिस्तूल डॉ.नरेंद्र दाभोलकर तर दुसरे डॉ. कलबुर्गी हत्येच्या प्रकरणात वापरल्याचा दावा विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी आज केला. संशयित आरोपी समीर गायकवाडला पाहणाऱ्यांसह ठोस पुरावे आहेत. त्याला जामीन दिल्यास तो फरारी होण्याची व साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्‍यता आहे त्यामुळे त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद निंबाळकर यांनी आज येथे केला. जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी उद्या (ता.17) ठेवण्यात आली असून तेथे निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

पानसरे हत्येतील अटक केलेला पहिला संशयित आरोपी सनातनचा साधक समीर गायकवाड यांच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा यासाठी तिसऱ्या वेळी न्यायालयात अर्ज केला. याबाबतची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. गेल्या आठवड्यात समीरचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आपली बाजू मांडली होती. आज सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली.

पानसरे यांची हत्याबाबत ठोस माहिती देणारा आणखी एक साक्षीदार पुढे आला आहे. पानसरे यांच्या घराजवळ 15 फेब्रुवारी 2015 ला दोन मोटारसायकलवरून चौघांना रेकी करताना पाहिले होते. त्यानंतर घटनेच्या दिवशी (ता.16 फेब्रुवारी) त्या चौघांना पाहिले होते. त्या चौघांनी दोन पिस्तुलातून पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.

त्यातील एका पिस्तुलाचा वापर डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि दुसऱ्या पिस्तुलाचा वापर डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी करण्यात आल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात स्पष्ट झाल्याचा दावा ऍड. निंबाळकर यांनी आज न्यायालयात केला. सीबीआयने अद्याप कोणतेही पिस्तुल जप्त केलेले नाही. पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या पिस्तुलाचा याच्याशी काहीही संबध नाही. घटनास्थळी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत बंगरूळ फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आला आहे.

त्यावरील तिसरे मत अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबकडून मागविले आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे ऍड. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.