'डॉ. संजय पाटील यांनी जोमाने काम करावे'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ‘डॉ. संजय पाटील यांनी चढ-उतारांनी दबून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे. असे चढ-उतार जो माणूस सहन करतो, तोच यशस्वी होतो,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

कोल्हापूर - ‘डॉ. संजय पाटील यांनी चढ-उतारांनी दबून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे. असे चढ-उतार जो माणूस सहन करतो, तोच यशस्वी होतो,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. डॉ. संजय पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, हिंदूराव शेळके, बाबा देसाई, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, दादासाहेब पाटील, बाळासाहेब नवणे, दत्तात्रय पाटील यांच्यासह समूहाचे संचालक उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘तंबाखू संघाच्या वाट्याला ज्या वाईट घटना आल्या, त्या कशामुळे आल्या याचा अभ्यास डॉ. पाटील यांनी करावा. इंदिरा गांधी यांच्या वाट्याला  सुवर्णकाळ आला, तसेच वाईट दिवसही आले. समूहाशी संबंधित कोणत्या चौकशा लागल्या ते पाहा. जिल्ह्यातील दहा संस्था अडचणीत होत्या, त्यांना मदत केली. त्यामुळे ‘मयूर’ला पुन्हा अच्छे दिन येतील.’’

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘तंबाखू संघ हा जिल्ह्यात नावाजलेला संघ होता. लोकांचा सहकारावर मोठा विश्‍वास होता; मात्र संजय पाटील राजकारणात आल्याने लोकांची मोठी अडचण झाली. सहकारात विश्‍वासार्हता महत्त्वाची आहे. तंबाखू संघाने बुरे दिन पाहिले; मात्र पाटील यांच्या प्रयत्नातून निश्‍चितपणे अच्छे दिन येतील.’’

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, ‘‘एक काळ असा होता, की तंबाखू संघाशिवाय जिल्ह्याचे राजकारण व्हायचे नाही. राजकारणात नेमके शक्तिस्थळावर हल्ले केले जातात. तीच वेळ एस. के. पाटील आणि पर्यायाने डॉ. पाटील यांच्यावर आली. एस. के. पाटील यांनी जी मोट बांधली, ती आजही कायम आहे.’’

आमदार उल्हास पाटील यांनी संस्थेच्या नावातील ‘शेतकरी’ हे नाव महत्त्वाचे असून डॉ. पाटील यांनी डगमगून जाऊ नये. संघाच्या वाट्याला पुन्हा वैभव येईल असे सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘‘आपण बरेच भोगले आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आमच्या परिवारात विष कालवण्याचा प्रयत्न झाला. ज्यांनी जाळे विणले, तेच आता जाळ्यात सापडले. समूहाने उन्नतीकडे वाटचाल केली आहे. चार हजार सभासद, साठ ते सत्तर संचालकांच्या जोरावर आजही समूह भक्कमपणे उभा आहे. १५० कोटींची उलाढाल २०० कोटींवर नेण्याचे लक्ष्य आहे.’’ 

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते संघाच्या स्मरणकिचे प्रकाशन झाले. सुशांत पाटील यांनी आभार मानले. 

शक्ती मिल्स ३८ हजार कोटींची
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३४ हजार कोटींची आहे; तर मुुंबईतील शक्ती मिल्सची किंमत ३८ हजार कोटींच्या घरात आहे. या मिलवरील स्थगिती उठावी, यासाठी वकिलांची फौज लावली आहे. प्रसंगी तक्रारदाराशी तडजोड करायला तयार आहोत. ही मालमत्ता मिळाल्यास कर्जमाफीसारख्या चांगल्या योजना राबवता येतील.