सराईत घरफोड्यास शहरात अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

चार गुन्हे उघडकीस - ४७ तोळे सोन्याचे दागिने जप्त; संशयित उचगावचा

कोल्हापूर - सराईत घरफोड्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. राजू प्रकाश नागरगोजे ऊर्फ राजवीर सुभाष देसाई (वय २९, मूळ रा. उचगाव, सध्या रा. निपाणी, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून साडेतेरा लाख रुपये किमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. 

शहर परिसरात घरफोड्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची चार पथके तैनात केली आहेत. ही पथके मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गस्त घालत होती. त्या वेळी त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार राजू नागरगोजे ऊर्फ राजवीर देसाई हा संशयितरीत्या फिरताना दिसून आला. त्याला पथकाने साफळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या अंगझडतीत सोन्याचा लफ्फा, चेन आणि ११ अंगठ्या असा सुमारे तेरा लाखांचा ऐवज सापडला. 

प्राथमिक चौकशीत त्याने हे दागिने घरफोडीतील असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात त्याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील एक, शाहूपुरी पोलिस ठाण्यातील दोन आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यातील एक अशा चार गुन्ह्यांची कबुली दिली. 

त्यानंतर त्याला अटक करून चारही गुन्ह्यांतील मिळून ४७ तोळे सोन्याचे दागिने असा १३ लाख ४९ हजार ५६३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यात त्याच्यासह आणखी कोणी साथीदार आहे काय, याचाही पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, प्रवीण चौगुले, सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी, राजेंद्र सानप, युवराज आठरे आदींनी केली.