जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

कोल्हापूर - "हिरे माणके सोने उधळा, जयजयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा...' या गीतातील ओळी सार्थ ठरवत राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त काढलेली जल्लोषी मिरवणूक आज लक्षवेधी ठरली. ढोलांचा ठेका, मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके आणि चित्ररथातून शाहू राजांना अभिवादन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे पावसाच्या सरींत मिरवणूक काढण्यात आली. 

कोल्हापूर - "हिरे माणके सोने उधळा, जयजयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा...' या गीतातील ओळी सार्थ ठरवत राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त काढलेली जल्लोषी मिरवणूक आज लक्षवेधी ठरली. ढोलांचा ठेका, मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके आणि चित्ररथातून शाहू राजांना अभिवादन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे पावसाच्या सरींत मिरवणूक काढण्यात आली. 

मिरजकर तिकटी येथे सायंकाळी साडेचार वाजता हलगी, घुमकं, कैताळचा ठेका सुरू होताच पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाली. त्यामुळे चौकात जमा झालेल्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. परिसरातील आडोशाचा आधार घेत, ते तेथेच उभे राहिले. त्यानंतर पाऊस थांबला व करवीर नादच्या वादकांकडून ढोलांचा ठेका सुरू होताच वातावरणात चैतन्य पसरले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पूजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. मिरवणूक पुढे सरकू लागली. बिनखांबी गणेश मंदिरापासून मिरवणूक पुढे जाताच मुलींनी हलगीच्या कडाकडाटावर लेझीमचा फेर धरला. लेझीमच्या अप्रतीम सादरीकरणावर शिट्यांचा आवाज घुमला. झुंजार मर्दानी खेळ आखाड्याच्या मुला-मुलींचे रक्तही सळसळले. लाठी, पट्टा, फरी गदका, लिंबू काढणीची थरारक प्रात्यक्षिके पाहताना अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. 74 वर्षीय बाबासाहेब पोवार-लबेकरी यांनी चौघा फरी गदका धारकांविरुद्ध लाठी लढत सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. 

किरण मांगुरे यांच्या सजविलेल्या बग्गीत राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेतील महेश कामत यांनीही अनेकांचे लक्ष वेधले. प्राजक्ता बागल ही बादल घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाली होती. बैलगाड्यांवरील शाहूंच्या कर्तृत्वाच्या आठवणी सांगणारे चित्ररथ होते. त्यात वैदिक स्कूलची स्थापना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेली शैक्षणिक मदत, महाराणी ताराराणी स्मारक, खासबाग मैदान, राधानगरी धरण, शाहू ऍग्रीकल्चर, वसतिगृहे, कळंबा तलाव, छत्रपती शिवराय व ताराराणींचा रथोत्सवातील छायाचित्रांचा समावेश होता. 

प्रमुख संयोजक पैलवान बाबा महाडिक, हिंदुराव हुजरे-पाटील, प्रिन्स क्‍लबचे अशोक पोवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, सणगर-बोडके तालमीचे बाबा पार्टे, स्वप्नील पार्टे, शिवसेनेचे किशोर घाटगे, मल्हार सेनेचे बबन रानगे, शाहू मॅरेथॉनचे किसन भोसले, उदय घोरपडे, नरेंद्र इनामदार, बजापराव माने तालमीचे संभाजी जगदाळे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज उस्ताद, संयुक्त जुना बुधवार तालमीचे अविनाश साळोखे, खंडोबा तालमीचे सुरेश जरग, श्रीकांत भोसले, काळाईमाम तालमीचे वसंतराव सांगवडेकर, डॉ. संदीप पाटील, जयसिंग शिंदे, राजन पाटील, युवराज महाडिक, शिवराज महाडिक या वेळी सहभागी झाले होते. 

शाहू वैदिक विद्यालयातर्फे अभिवादन 
शाहू वैदिक विद्यालयातर्फे तुळजाभवानी मंदिरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शाहू राजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. या प्रसंगी याज्ञसेनी महाराणी छत्रपती, यशराजे उपस्थित होते. या वेळी छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. दुपारी एक वाजता मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांना सुरवात झाली. सुमारे पन्नास संघांनी त्यात सहभाग घेतला.