शाहू साखर कारखान्याची गाळपक्षमता ५ हजारांवरून ७ हजारांवर

शाहू साखर कारखान्याची गाळपक्षमता ५ हजारांवरून ७ हजारांवर

कागल - ‘कारखान्याची गाळप क्षमता पाच हजारांवरून यंदा सात हजार मेट्रिक टन केली आहे. विस्तारीकरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या पाच मिल बसविल्या आहेत. त्यामुळे बगॅसमधून जाणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी होऊन उताऱ्यामध्ये वाढ होणार आहे. बगॅसची आर्द्रता कमी होऊन वीजनिर्मितीपासून जादा उत्पन्न मिळेल. सभासदांनी आपला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे’, असे आवाहन शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. 

कारखान्याच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. नॅशनल शुगर फेडरेशन (दिल्ली) यांच्या वतीने कारखान्याला ऊस विकास कार्यक्रमात मिळालेल्या प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराबद्दल समरजितसिंह घाटगे, तसेच कार्यकारी संचालक विजय औताडे व डॉ. राजाराम पाटील (हसूर खुर्द) यांचाही सत्कार झाला.   

समरजितसिंह म्हणाले, ‘‘गत हंगामात कारखाना ११४ दिवस चालला. १२.५४ उताऱ्याने ६ लाख ८९ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. या काळातील वीजनिर्मितीतून २४ कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आसवनी प्रकल्पामधून ४४ हजार ६१४ लिटर स्पिरिट उत्पादन झाले आहे. आसवनीची उत्पादनक्षमता ४५ हजार लिटरवरून ६० हजारपर्यंत वाढविण्याबाबत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे.’’  

ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने सन २०१६-१७ करिता एफआरपी प्रति टन ३०२८.४२ रुपये इतकी ठरविली आहे. त्यातून ऊसतोडणी, वाहतूक वजा जाता निव्वळ एफआरपी प्रतिटन २४९८.४० इतकी येते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शेतकरी संघटना यांच्यातील तोडग्यानुसार एफआरपी २५०० अधिक १७५ रुपये जादा असा एकूण २६७५ ॲडव्हान्स दिलेला आहे. एप्रिलमध्ये १२५ रुपये व जुलैमध्ये २०० रुपये प्रतिटन अदा केले आहेत. तसेच व्हरायटी अनुदानासह आतापर्यंत एकूण ३०५० रुपये अादा केलेले आहेत. व्हरायटी अनुदान सरासरी पन्नास रुपये, अंतिम ऊसदरापोटी १२५ रुपये दिवाळीपूर्वी देणार आहोत. त्यामुळे दर सरासरी ३१७५ रुपये होतो.’’

घाटगे म्हणाले, ‘‘शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय केवळ लोकसहभाग, श्रमदान व लोकवर्गणीतून जलयुक्त शिवार ही योजना हाती घेतली आहे.  बोळावीवाडी येथे याची सुरवात केली आहे. या कामामुळे या गावाचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. श्रमदानाला मी तसेच नवोदिता घाटगे यांनी सहभागाने सुरवात केली.’’ 

उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सचिव एस. ए. कांबळे यांनी प्रश्‍नांचे वाचन केले. संचालक युवराज अर्जुन पाटील यांनी आभार मानले. या वेळी सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com