पुढील शिवराज्याभिषेकास इंग्लंड, फ्रान्सच्या राजदूतांना आमंत्रण - संभाजीराजे

संदीप खांडेकर
बुधवार, 6 जून 2018

शिवरायांच्या गडांची सर जर्मनी व अन्य देशातील गडांना नाही. जेथे युद्ध झाले नाही, त्या गडांचा काय उपयोग, असे संभाजीराजे म्हणाले.​

रायगड - रायगडमुळेच मला ताकद मिळाली असून दिल्लीत माझ्यासाठी संभाजीराजे छत्रपती म्हणून नव्हे तर शिवछत्रपतींचा वंशज असल्याने रेड कार्पेट टाकले जाते, असे सांगत पुढील शिवराज्याभिषेकासाठी डच, इंग्लंड व फ्रान्सच्या भारतीय राजदूतांना रायगडावर आमंत्रित करून शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे त्यांना दर्शन घडवणार आहे, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, "दिल्ली दरबारी शिक्षण, उद्योग व सहकार सम्राट गेले. त्यांनी तेथे शिवजयंती साजरी का केली नाही? मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक घ्यावी, अशी माझी सूचना आहे. त्याचवेळी मंत्र्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाची कल्पना सर्वांना येईल. केवळ भाषणात त्यांचे नाव घेऊन चालणार नाही. मला कोरेगाव भीमा घटनेबद्दल खंत वाटते. शिवरायांच्या कर्मभूमीत हे घडतेच कसे? ही भूमी शिवराय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीत काही अनुचित घडत असेल तर मी रस्त्यावर उतरणार आहे."

"शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या नेत्यांचा मी अभ्यास करत आहे. खरोखरच शेतकऱ्यांविषयी त्यांना कळवळा आहे, की ती त्यांची राजकीय सोय आहे, हे तपासून पाहणार आहे. अठरापगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मला काम  करायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी माझा लढा सुरू आहे."

- संभाजीराजे छत्रपती, खासदार

यावेळी फिजीचे राजदूत रोनील कुमार, पशू संवर्धन राज्य मंत्री महादेव जानकर, खासदार हेमंत गोडसे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, डॉ. पी. टी. गायकवाड, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, माजी नगरसेवक विनायक फाळके, संजय पोवार, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते उपस्थित होते. अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले.

संभाजीराजे म्हणतात....

  • पुढील वर्षी गडावरील ८४ टाक्यांमधील पाणी शिवभक्तांना उपलब्ध करु
  • रायगड विकास प्राधिकरणातर्फे गडपायथ्यापासून माथ्यापर्यंत फरसबंद करणार
  • औरंगाबादमधील रायगडचे अवशेष गडावर परत आणणार
  • गडाच्या कामात हेळसांड केल्यास कामावरून हद्दपार करणार

प्लास्टिक हा गडाचा शत्रू...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गडाची स्वच्छता झाली. राज्यातील एकाही गडावर कचरा होणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. हे शिवधनुष्य आपण उचलुया, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

शिवरायांच्या गडांची सर जर्मनी व अन्य देशातील गडांना नाही. जेथे युद्ध झाले नाही, त्या गडांचा काय उपयोग, असे संभाजीराजे म्हणाले.

Web Title: Kolhapur News Shiv Rajyabhishekha Sohala Sambhaji Raje comment