शिवाजी विद्यापीठातील अधिकार मंडळांसाठी चाचपणी सुरू

शिवाजी विद्यापीठातील अधिकार मंडळांसाठी चाचपणी सुरू

कोल्हापूर - नव्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार होऊ घातलेल्या शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांच्या (सिनेट) निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली. शिवाजी विद्यापीठ विकास मंचने शैक्षणिक अर्हता, विद्यापीठीय प्रश्‍नांची माहिती, प्रशासकीय कामाचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने सक्षम उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जात आहे, एकूण नोंदणीकृत मतदारांत हक्काचे किती याची यादी संघटनांकडून तयार केली जात आहे.   

शिवाजी विद्यापीठ विकास मंचच्या झेंड्याखाली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), शिवाजी विद्यापीठ पी. जी. टीचर्स असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, आंतर महाविद्यालयीन शिक्षकेतर कमर्चारी संघटना व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटना एकत्र आल्या आहेत. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठ विकास मंडळाशी हातमिळवणी केल्याने या संघटनांचा ‘कॉन्फिडन्स’ वाढला आहे. अंतर्गत गढूळ राजकारणात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) अडकल्याने त्यांच्यात अद्याप एकसूत्रता दिसत नसल्याचे चित्र आहे. त्याचा नेमका फायदा विकास मंचने घेतला आहे. 

सिनेटसाठी एकूण ७७ जागा असून, कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य वगळता ३९ जागांवर निवडणूक होणार आहे. पदवीधर, पी. जी. टीचर्स, संस्था प्रतिनिधी, प्राचार्य व प्राध्यापक गटात सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ मंच व विकास आघाडीचा सूर जुळल्याने सिनेटमध्ये अभ्यासू उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार, याचे संकेत याआधीच दिले गेले. अभाविपने निवडणुकीच्या माध्यमातून आपला वरचष्मा राखण्यासाठी डावपेच आखल्याने अभ्यासू उमेदवारांना पर्याय राहणार नाही, असेच तूर्त चित्र आहे. 
व्यवस्थापन परिषदेसाठी २१ जागा असून, तेथेही आपले सक्षम सदस्य असण्यासाठी विकास मंचचा प्रयत्न राहणार आहे. 

‘सुटा’कडून हालचाली नाहीत
विशेष म्हणजे एकूण नोंदणीकृत मतदारांचा आकडा १४ हजार ७०० इतका आहे. त्यातही सुमारे नऊ हजार मतदारांची नोंदणी  विकास मंच, तर उर्वरित विकास आघाडीकडून झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सिनेटची निवडणूक एकतर्फी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुटाच्या गोटातील शांततेचे कारण अद्याप उलगडलेले नाही. मध्यंतरी संघटनेत समन्वयाचा अभाव दिसत असतानाही ‘आमच्यात तसे काही नाही,’ असा खुलासा केला. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर सुटाकडून हालचाली दिसत नाहीत. शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर सर्वच संघटना सुस्त असल्याचा आरोप केला. निवडणुकीला विलंब होत असूनही संघटना गप्प का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com