गणेशोत्सवात मंडळांकडून सिस्टिमचा दणदणाटच !

निखिल पंडितराव
शुक्रवार, 14 जुलै 2017

कोल्हापूर - गणेशोत्सवात काहीही झाले तरी आपल्या सिस्टिमचाच (डॉल्बी) आवाजाचा दणदणाट मोठा असला पाहिजे, असे ठरवून शहरातील मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली. अनेक मोठ्या मंडळांनी आपल्यासाठी खास नवीन सिस्टिम बांधून घेण्यास सुरवात केली आहे. पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेचा कारवाईचा धाक घ्यायचा नाही. आवाज सिस्टिमचाच असा, नारा या मंडळांनी दिला आहे. 

कोल्हापूर - गणेशोत्सवात काहीही झाले तरी आपल्या सिस्टिमचाच (डॉल्बी) आवाजाचा दणदणाट मोठा असला पाहिजे, असे ठरवून शहरातील मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली. अनेक मोठ्या मंडळांनी आपल्यासाठी खास नवीन सिस्टिम बांधून घेण्यास सुरवात केली आहे. पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेचा कारवाईचा धाक घ्यायचा नाही. आवाज सिस्टिमचाच असा, नारा या मंडळांनी दिला आहे. 

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत वर्चस्ववादातून सिस्टिमच्या दणदणाटाचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले आहे. इर्षा आणि आपलीच मिरवणूक कशी मोठी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात सिस्टिम लावून त्यावर तरूणाईला थिरकायला लावण्याचा प्रकार मिरवणुकीत होतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने कितीही आदेश दिले. तरी त्याला धाब्यावर बसवून मंडळांकडून सिस्टिमचा वापर मिरवणुकीत होत आहे. यावर्षी ही याची तयारी सुरू झाली आहे. अनेक मंडळांनी मुंबई, गोवा, पुणे येथून सिस्टिम, एलईडी वॉल भाड्याने घेण्याची तयारी सुरू केली आहे. काही जणांनी तर खास आपल्यासाठी स्वतंत्र सिस्टिम बांधण्याचे काम सुरू केले आहे. सिस्टिमच्या दणदणाटाच्या चाचण्या ही सुरू झाल्या आहेत. 

मिरवणुकीत काहीही झाले तरी सिस्टिम वाजणारच, असे ठरवून तयारी सुरू असल्याने ध्वनीप्रदूषणाचा प्रश्‍न यंदाच्या मिरवणुकीत गंभीर बनणार आहे. लाखो रुपयांच्या चुराडा या सिस्टिमवर केला जाणार आहे. 

कशामुळे धाडस
दरवर्षी पोलिस प्रशाननाच्यावतीने डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात येतो. यासाठी तरूण मंडळे, तालीम संस्था, डॉल्बी लावणारे मालक, चालक, अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे नियोजन केले जाते, परंतू हा सगळा केवळ कागदोपत्री रंगवलेला खेळच असतो. न्यायालयात कोणी गेले किंवा आपली चौकशी लागली तर आपण केलेल्या या प्रयत्नांचे कागदी घोडे नाचविण्यासाठी याचा वापर होतो. गतवर्षी ही अशाच पद्धतीने कारवाईची भिती घालण्यात आली, अगदी विसर्जन मिरवणूकीच्या समारोपाच्या भाषणात ही कारवाईचा इशारा देण्यात आला. परंतू राजकीय दबावाखाली पोलिस यंत्रणा आली, अखेर जुजबी कारवाई करण्यात आली. हे काय केवळ गतवर्षीच घडले, असे नाही. वर्षोनुवर्षे हेच चालत आल्यानेच मंडळांचे डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण करण्याचे धाडस वाढत चालेले आहे. 

सिस्टिम लावल्याचे परिणाम
- बेंजो व बॅंन्ड पथकातील लोकांना कमी रोजगार मिळणार
- पारंपारिक वाद्ये वाजवणाऱ्यांचे उत्पन्न घटणार
- ध्वनी प्रदूषणात वाढ होवून कान, हृदयविकारांच्या रुग्ण वाढणार
- दणदणाटामुळे वृद्ध, गरोदर महिलांना भयंकर त्रास
- विसर्जन मिरवणुकीत महिला, तरूणींना धक्काबुक्की व छेडछाडीचे प्रकार

दोन वर्षे सिस्टिमच
लोकसभा, विधानसभेच्‍या निवडणुका दोन वर्षात आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता मोठ्या आवाजाची सिस्टिम लावणाऱ्यांवर कारवाईचा प्रश्‍नच येत नाही. राजकीय नेत्यांच्या दबावाखाली कारवाई झालीच तरी केवळ दंडात्मक होईल, हे निश्‍चित. याची पहिली झलक राजारामपुरीत गणेश आगमनाच्या दिवशीच पाहण्यास मिळणार आहे.