भोरड्यांचा आवाज कसा लिपीबद्ध करायचा?

अमोल सावंत
बुधवार, 11 एप्रिल 2018

अन्य पक्ष्यांचा आवाज हा निदान शब्दबद्ध तरी करता येतो; पण भोरड्यांच्या आवाजाची ही लिपी अजूनतरी कुणाला शब्दबद्ध करता आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा पक्षी ऑक्‍टोबर ते जूनदरम्यान मोठ्या संख्येने आढळतो.

कोल्हापूर - अक्षरश: पिळवटून टाकणारी दुपार. रानात चिडीचूप शांतता. वसंतात आलेल्या पालवीचाही आवाज नाही. दूरवर कुठे चिटपाखरूही दिसत नाही. नेमक्‍या अशाच शांततेत छोट्या झुडपांवर विसावलेला भोरड्यांचा (रोझी स्टर्लिंग) थवा ती शांतता भंग करतो. एका सुरात हा थवा गाऊ लागतो, तेव्हा दूरवर शिवारात हा आवाज शांतता चिरत जातो. भोरड्या का गातात? भोरड्यांचं हे गाणं नेमकं कसं शब्दांकित करायचं, हा प्रश्‍न पक्षीनिरीक्षकांना पडलेला असतो. 

अन्य पक्ष्यांचा आवाज हा निदान शब्दबद्ध तरी करता येतो; पण भोरड्यांच्या आवाजाची ही लिपी अजूनतरी कुणाला शब्दबद्ध करता आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा पक्षी ऑक्‍टोबर ते जूनदरम्यान मोठ्या संख्येने आढळतो. आपल्या आगळ्यावेगळ्या आवाजाने तो लक्ष वेधून घेतो. आजही खेडेगावात भोरड्या गाऊ लागल्या, की कुठेतरी एखादा विषारी साप वळवळत जात असावा, अशी समजूत आहे.        

आगळावेगळा भोरडी
युरोपचा आग्नेय भाग (इटलीपर्यंत) आणि आशिया मायनरपासून तुर्कस्तानपर्यंतचा आशियाचा भाग यात राहणारा भोरडी हा पक्षी आहे. थंडीच्या दिवसांत भारतात पूर्व युरोपातून पर्शिया, अफगाणिस्तान मार्गे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रात भोरड्या येतात. पश्‍चिम महाराष्ट्रात भिगवण, बारामतीतील शारदानगर येथील नीरा डाव्या कालव्याशेजारी, इंदापूर, माळीनगर, फलटण, राजेवाडी, दौंड तालुक्‍यातील काही भाग भोरड्यांच्या निवासासाठी प्रसिद्ध आहे. भोरड्यांच्या विश्रांतिस्थळ शोधण्यासाठी केलेल्या कवायतींना ‘कम्युनल डिस्प्ले’ किंवा ‘युरोबॅटिक्‍स’ म्हणतात. भोरड्या जर्मनी, हंगेरी, पूर्व युरोपियन देशांतून सप्टेंबरपूर्वी प्रजननाचा कालावधी उरकून पिलांना घेऊन येतात. त्या भारतभर पसरतात; परंतु दक्षिणेकडे त्यांची कमी संख्या असते. त्या ऑक्‍टोबरमध्ये येण्यास सुरवात होते. भारतात खायला भरपूर मिळत असल्याने त्या येथे अधिक काळ राहतात. त्या जिथे मुक्काम करतात, तेथील भागासाठी एक पर्वणीच असते. त्या सतत जागा बदलतात. पळस मैना म्हणून ओळखला जाणारा भोरडा किंवा भोरडीचे हे थवे आता शहर परिसरातही दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. भोरड्या परिसरात दाट झाडी असली तरी खुरट्या झुडपांवरच बसतात. हा साळुंकीएवढा असतो. सगळे शरिर गुलाबी रंगाचे असते. गुलाबी रंगात किंचित करडी झाकही असते.  

भोरड्यांच्या कवायती
दररोज सकाळी, संध्याकाळी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन भोरड्यांचा आभाळात खेळ सुरु असतो. दिवसभर अन्नासाठी विखरुन जातात. संध्याकाळी भोरड्यांचा थवा एकत्र येतो. आधी शंभर, मग हजार, नंतर जवळपास दहा हजारांच्या संख्येने या भोरड्या एकमेकांत मिसळत जातात. संपूर्ण थवा एकत्र झाल्यानंतर आकाशात एकावेळेस कोणत्याही मार्गदर्शनाविना त्यांच्या कवायती सुरू होतात. कोणत्याही झाडावर, झुडूपावर संपूर्ण थवा एकदम बसतो. एका क्षणात हा थवा झाडाचा ताबा घेतो. मग भोरड्यांचा दिवस मावळेपर्यंत कलकलाट 
सुरू राहतो. 

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, वारणानगर, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, शिरोळ भागात भोरड्यांचे प्रमाण मे ते जून दरम्यान खूप असते. रब्बी ज्वारीचे पिक तयार झाल्यावर भोरड्यांच्या झुंडी सकाळ-संध्याकाळ कणसांवर हल्ला चढवून दाणे खातात. गवत बीसुद्धा खातात. पिकांची बरीच नासधुसही करतात. ते धान्याबरोबर पिकांना नुकसान करणारे नाकतोडे, टोळ अन्य किड्यांचाही फन्ना उडवितात. वड, पिंपळ, टणटणी, तुतीची फळेही खातात. भोरड्यांचे थवे पाहणे, त्यांचा एकत्रित कलकलाट ऐकणे ही एक आनंदाची पर्वणी असते.’’ 
- सुहास वायंगणकर,
पक्षी अभ्यासक

Web Title: Kolhapur News special Story on Rozhi Sterling Bhorda