मसाला डबा गेला; पॅकेजिंग मसाला आला!

मसाला डबा गेला; पॅकेजिंग मसाला आला!

कोल्हापूर - पूर्वी स्वयंपाकघरात मसाल्याचा डबा हा असायचाच. प्रत्येक महिन्याला सुट्या मसाल्यांची खरेदी ही आवर्जून केली जायची. किराणा मालाच्या यादीत हळद, जिरे, हिंग, काळी मिरी, बडीशेप, धणे, खोबरे यापैकी एखादा तरी पदार्थाचा समावेश हा केला जात असे. मसाले निवडून ते एकत्र केले जात; मग पाटा वरंवटा घेऊन ते वाटले जात. जेवण करण्यासाठी वेळही मिळायचा. आज ही परिस्थिती अजिबात नाही. 

आज अनेक स्त्रिया नोकरी, व्यवसाय, करिअर, शिक्षणानिमित्त घराबाहेर पडत आहेत. स्वयंपाक करायला इतका वेळ कुठला? अशा या वेगवान स्थित्यंतरात मात्र पारंपरिक पद्धतीने मसाल्यांचा वापर करुन जेवण बनविण्याचा ट्रेंड मागे पडला. आणि मसाल्याचा डबा जणू स्वयंपाकघरातून हद्दपार झाला. आज विविध कंपन्यांच्या पॅकेजिंग रेडीमेड मिक्‍स मसाल्यांनी स्वयंपाकघरात प्रवेश केला आहे. 

‘‘वनसंपदा कमी झाल्यामुळे मसाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात मसाले उत्पादन कमी असून आपल्याकडे मार्केटमध्ये मिळणारे मसाले हे प्रामुख्याने आंधप्रदेश, केरळमधून सर्वाधिक येतात. सातत्याने मार्केट उपलब्ध असल्यामुळे मसाल्याचे उत्पादन घेतले तर शेतकऱ्याला फायदा खूप मिळतो. विविध कंपन्यांचे पॅकेजिंग मसाले बाजारात आले असले तरीही चटणी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यासाठी कोल्हापुरात सुटे मसाले विकत घेण्याचे प्रमाण खूप आहे. विशेष म्हणते, ते अद्यापही टिकून असल्याने कोल्हापूरच्या कांदा-लसूण मसाला चटणीला संपूर्ण देशभरातून मागणी आहे.’’ 
- बबन महाजन,
शिवाजी मार्केट   

मॉल किंवा किराणा मालाच्या दुकानात गेले की, या मिक्‍स पॅकेजिंग मसाल्यांचा प्रभाव नजरेस येतो. सब्जी मसाला, गरम मसाला, चिकन मसाला अन्‌ कितीरी मसाल्यांचे तयार प्रकार नजरेस पडतात. प्रत्येक रेसीपीजला वेगळा मसाला मिळतो. जेवण तयार करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, तो आज कुणाजवळही नाही. यामुळे मिक्‍स मसाल्यांना खूप मागणी आहे. मिक्‍स मसाला निर्मितीत अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. कोल्हापुरातही अनेक स्थानिक कंपन्यांनी मिक्‍स 
मसाले निर्मितीत आपले ‘ब्रॅडिंग’ केले आहे. मिक्‍स मसाल्यांमुळे सुट्या मसाल्यांना मागणी तुलनेने कमी झाली आहे. 

एक नजर मसाला मार्केटवर

  •  भारतीय बाजारात १५ टक्के वाटा हा ब्रॅंडेड पॅकेजिंग मसाल्यांचा
  •  पॅकेजिंग मसाले विक्रीत अनेक स्थानिक कंपन्यांचा समावेश
  •  मिक्‍स्ड मसाले विक्रीतून अनेक कंपन्यांना प्रचंड नफा 
  •  भारतीय मसाल्यांची वार्षिक उलाढाल ही ४० हजार कोटी
  •  भारतातून ५२ प्रकारांच्या मसाल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात
  •  २०२० मध्ये भारतात १८ अब्ज डॉलर इतकी मसाला मार्केटमध्ये उलाढाल
  •  ब्रॅंडेड पॅकेजिंग मसाल्यांमध्ये वार्षिक उलाढाल १४ टक्के 
  •  अमेरिका हा मुख्य भारतीय मसाल्यांचा आयातदार (१६ टक्के), चीनकडून नऊ टक्के तर युनायटेड अरब अमिरात आणि मलेशिया सहा टक्के, जर्मनी, श्रीलंका, सिंगापूर, इंग्लंडकडून चार टक्के

याबाबत बबन महाजन म्हणतात, ‘‘मिक्‍स मसाल्यांनी मार्केट व्यापले असले तरी आपल्याकडे आजही मसाल्याचे प्रमाण साधून चटणी, स्वयंपाक केला जातो. दररोजच्या स्वयंपाकात मसाले वापर असला तरी प्रामुख्याने आपल्याकडे चटणी तयार करण्यासाठी जास्त मसाल्यांची खरेदी केली जाते. या चटणीला कोल्हापूरी कांदा लसूण मसाला चटणी असे म्हणतात. ही चटणी बनविण्याची पद्धती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच टिकून आहे. पर्यटक जेव्हा इथे येतात, तेव्हा ते ही चटणी आवर्जून विकत घेतात. चव चांगली असल्यामुळे देशाच्या विविध भागातून या चटणीला मागणी आहे. यातून शहराचा नावलौकिक वाढतो, हे महत्वाचे. ९५ टक्के मसाले हे परदेशातून मागवले जात असल्याने किमतीत चढ उतार राहतात.  आपल्याकडे थोड्या प्रमाणात खरेदी करत असल्यामुळे मसाल्यांच्या किंमती आजही सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहेत.’’

थोडेसे मसाल्यांबाबत..! 

  •  सर्व प्रकारचे मसाले खरेदी करा; जेणेकरुन ती खूप काळ वापरता येतील

  •  खरेदी करताना ते किलोने न घेता थोड्या प्रमाणात घ्या

  •  प्रत्येक मसाला कमीत कमी एक वर्षभरच वापरा 

  •  मसाले थंड, कोरड्या जागी साठवून ठेवा; मात्र फ्रीजमध्ये अजिबात नको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com