गायी चरायला गावात... दुधाला मालकाच्या घरात

गायी चरायला गावात... दुधाला मालकाच्या घरात

कोल्हापूर - ही गाय आहे, म्हणून तिला हाकलायचे नाही. रस्त्यावर ठाण मांडून गायींचा कळप बसला, तरी त्यांना पिटाळायचे नाही. त्यांना पकडून कोंडवाड्यातही सोडायचे नाही. कारण कोणी तसा प्रयत्न केला, तर गायीच्या कळपांचे ठराविक मालक कारवाई करणाऱ्यांना ‘‘सरळ सोडत’’ नाहीत. त्यामुळे शहरात गायींचे कळपच्या कळप फिरत आहेत. रात्री दूध द्यायला मालकाच्या घरात आणि दिवसभर वावरायला रस्ते, गल्ली-बोळात, अशी त्यांची अवस्था आहे. आज लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात या गायींच्या कळपांनी हैदोस घातला. काही काळ बाजार उधळला गेला.

कोल्हापुरात एक नाही, दोन नाही, वीस ते बावीस गायींचे कळप आहेत. अक्षरशः हद्द वाटून घेतल्यासारखे या गायींचे आपापल्या भागात फिरणे आहे. लोकांना वाटते या गायी अनाथ आहेत; पण वास्तव खूप वेगळे आहे. रस्त्यावर कळपाच्या कळपाने फिरणाऱ्या या सर्व गायी खासगी मालकांच्या आहेत. सकाळी त्यांचे दूध काढले, की त्या बाहेर पडतात. दिवसभर गावात गवत कमी, पण मिळेल ते खाऊन संध्याकाळी मालकाच्या दारात परत येतात. खाण्यासाठी विशेषतः भाजी मार्केट, हॉटेलची कचराकुंडी असला परिसर शोधतात. काहीतरी खायला मिळेल, या आशेने कचराकुंड्या उपसून टाकतात. प्लास्टिक पिशवीत भरून टाकलेले शिळे अन्न, भाजीपाल्याची देठे, साली खातात. त्याबरोबरीने त्यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या जातात.

या गायी खाण्यासाठी कोठेही तोंड घालतात व रवंथ करत रस्त्यावर मध्येच बसतात. या गायी देवाच्या असे मानले जात असल्याने त्यांच्यावर कोणी काठी उगारीत नाही. त्यांना पिटाळून लावत नाही. वास्तव हे आहे, की या गायी खासगी मालकांच्या आहेत आणि गावाच्या जिवावर त्यांनी पोसल्या आहेत. या गायींचे दूध व मलई यावर मात्र त्याची मालकी आहे.
या गायी पकडण्याचा ज्या ज्या वेळी प्रयत्न झाला, त्या वेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागला.

गायी पकडायला सुरवात व्हायचा अवकाश या गायींचे मालकही सोबत दहा-बारा जणांना घेऊन येतात व जबरदस्तीने गायी सोडवतात. एकदा तर महापालिकेचे कर्मचारी या गायींना ट्रकमधून विशाळगड परिसरात नेऊन सोडण्यासाठी जाताना गायी कसाबाला विकण्यासाठी घेऊन जात आहेत, असा त्यांच्यावर आरोप केला. तो ट्रक अडवला. लोकांची गर्दी झाली, पण महापालिकेचे कर्मचारीही तोडीस तोड निघाले. त्यांनी प्रतिकार हाणून पाडला व गायी कसाबाला नव्हे, तर जंगलात नेऊन सोडण्यासाठी जात असल्याचे जमावाला पटवून दिले;
मात्र रोज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना असा प्रतिकार करता येत नाही. त्यामुळे या गायी पकडता येत नाहीत. त्यामुळे शहरात गायींचे कळपच्या कळप फिरत आहेत. गायी पकडण्याची कारवाई म्हणजे जणू काही गुन्हा अशीच भीती कर्मचाऱ्यांत निर्माण झाली.

पोलिसांनी कारवाई केली तरच मालकांना धडा
या गायी देवाला सोडलेल्या नाहीत. खासगी मालकांच्या आहेत, हे स्पष्टपणे कोल्हापूरकरांना महापालिकेने कळवण्याची गरज आहे. वाहतुकीला अडथळा करणाऱ्या या गायींना पकडण्याची कारवाई पोलिसांनी केली, तरच गायमालकांना धडा मिळणार आहे. गाय मालकाची महापालिका कर्मचाऱ्यांवर दादागिरी असल्याने कारवाई होत नाही, अशी परिस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com