कोल्हापूर शहरात भटकी कुत्री हजारांवर; पकडणारे मात्र तिघेच

सुधाकर काशीद
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - भटक्‍या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण हा जरूर उपाय आहे; पण त्यासाठी रोज किमान आठ ते दहा कुत्री जिवंत पकडणे ही महापालिकेसमोरची खरी कसोटी आहे  आणि जिवंत कुत्री पकडणे हा अनुभव महापालिकेला नसल्याने आता येथील तीन कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या केंद्रातून कुत्रे पकडण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

अर्थात एक मुकादम व दोन कर्मचारी अशा तिघांना रोज आठ ते दहा कुत्री पकडण्यासाठी मोठी धावाधाव करावी लागते. कारण कुत्री एवढी हुशार की, या तीन कर्मचाऱ्यांना जणू त्यांनी ओळखूनच ठेवले आहे. हे तिघे दिसायचा अवकाश, कुत्री सांदी कोपरा शोधून पळ काढत आहेत.

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी महापालिकेने आयसोलेशन हॉस्पिटल इमारतीमधील तीन खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तेथे खासगी संस्थेतर्फे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे; पण कुत्री पकडून देण्याची जबाबदारी महापालिका आरोग्य विभागाची आहे. कुत्री मारून त्यांच्या संख्येवर आळा घालता येत नाही. कुत्र्याला विष घालून मारणे हेदेखील प्राणीदयेच्या भूमिकेतून योग्य नाही. त्यामुळे कुत्र्यांची वाढ त्यांचे निर्बीजीकरण करून रोखणे हाच एक मार्ग आहे. हा मार्ग कितपत यशस्वी होईल हा पुढचा भाग आहे; पण शहरात विशेषतः रात्रीच्या वेळी झुंडीच्या झुंडीने फिरणारी कुत्री पहिल्या टप्प्यात पकडणे खूप आव्हानाचे काम आहे.

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातर्फे मुकादम बाळू भिवा गणेशाचारी, अमर सुरेश कांबळे व अमर मधुकर हेगडे यांना महापालिकेने मुंबईस कुत्रे पकडण्याच्या सरावासाठी पाठवले. यापूर्वी कोल्हापुरात कुत्री पकडली न जाता ती गुळपेढ्यात विष घालून मारली जात होती; पण ही पद्धत क्रूर असल्याने त्याचा वावर थांबवला; पण त्याबरोबरच भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढतच गेली. एका एका भागात म्हणजे जेथे मटण, चिकनची दुकाने आहेत, खाऊच्या हातगाड्या आहेत, हॉटेलच्या खरकट्याचे प्रमाण कोंडाळ्यांत जास्त आहे, तेथे भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला. 

१५ ते २० च्या झुंडीने ही कुत्री फिरू लागली. ही कुत्री अनेकांना चावली. त्याही पेक्षा रात्रीच्या शांत वातावरणात निर्मनुष्य रस्त्यावर या कुत्र्यांची समोर झुंड पाहताच भीतीने अनेक वाहनचालकांची भंबेरी उडून हातपाय मोडून घेण्याची वेळ आली.
कोल्हापुरात किमान दोन ते तीन हजार भटकी कुत्री आहेत. रात्री त्यांचा वावर जास्त असतो. त्यांच्या हद्दी वाटून घेतल्यासारख्या आहेत. सहसा एक कुत्रे आपली हद्द सोडून दुसऱ्या हद्दीत जात नाही. कारण त्या हद्दीतली कुत्री त्याला आपल्या हद्दीत येऊ देत नाहीत. त्यामुळे कुत्री पकडण्यासाठी आणखी कर्मचारी लागणार आहेत; पण हे काम खूप धावपळीचे असल्याने या विभागात कोणी काम करण्यास येत नाही. गेली ३४ वर्षे बाळू गणेशाचारी हे एकच मुकादम या विभागात टिकून आहेत.

जाळी टाकून पकडण्याचे काम
निर्बिजीकरणासाठी जाळी टाकून कुत्री पकडण्यात येत आहेत. त्यासाठी साधारण तीन फूट व्यास असलेली व चार फूट लांब असलेली गोल जाळी असून ती जाळी कुत्र्याच्या अंगावर टाकून त्यांना पकडले जाते; पण कुत्री एवढी चलाख आहेत की, धरायला कोणी तरी आले आहे हे त्यांना लगेच जाणवते. अशा वेळी ते अशा एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसतात की, त्यांना पकडताच येत नाही. त्यांना ही मोहीम दिसली की, ती लांबवर धूम ठोकतात.