‘एफआरपी’पेक्षा ५५० कोटी जादा

निवास चौगले
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - गतवर्षीच्या साखर हंगामात जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून तब्बल ५५० कोटी रुपये एफआरपीपेक्षा जास्त दिले आहेत. गेल्या हंगामातील साखर कारखान्यांचे अंतिम दर जाहीर करण्यात आले. त्यात सरासरी प्रतिटन ४९२ रुपये जादा दिले. 

गेल्यावर्षीच्या हंगामात पहिल्या साडेनऊ टक्के उताऱ्याला प्रतिटन २३०० रुपये, तर पुढील प्रत्येक एक टक्‍क्‍याला २६८ रुपये एफआरपी जाहीर केली. शेतकरी संघटनांनी प्रतिटन ३३०० रुपये उचलीची मागणी केली. प्रत्यक्षात चर्चेअंती एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तोडगा काढला. गेल्यावर्षी उसाची कमतरता, त्यामुळे स्थिर असलेले साखरेचे दर यामुळे कारखानदारांनी मिळालेल्या नफ्यातून उत्पादकांसाठी चांगलेच हात सैल सोडले. 

गेल्यावर्षी जिल्ह्यात २३ कारखान्यांनी हंगाम घेतला. हंगामात १ कोटी १३ लाख ६९ हजार टन असे गाळप झाले. उताऱ्यानुसार कारखान्यांची एफआरपी प्रतिटन २३०० ते २६९९ पर्यंत होती. त्यात अधिकचे १७५ रुपये तर दिलेच; पण अतिरिक्त मिळणाऱ्या पैशातून कारखान्यांनी मोठी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. एफआरपीपेक्षा सर्वाधिक प्रतिटन ६४९ रुपये संताजी घोरपडे कारखान्याने, तर त्या खालोखाल ६२७ रुपये शाहू-कागल कारखान्याने दिले आहेत. सर्वांत कमी संघटनेसोबत झालेल्या तोडग्यानुसार १७५ रुपये ‘भोगावती’ कारखान्याने दिले आहेत.