जयसिंगपुरात शनिवारी होणाऱ्या ऊस परिषदेची तयारी जोरात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

जयसिंगपूर - यंदाच्या पहिल्या उचलीसाठी होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 16 व्या ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. पालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या परिषदेस महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

जयसिंगपूर - यंदाच्या पहिल्या उचलीसाठी होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 16 व्या ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. पालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या परिषदेस महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

व्यासपीठ, मैदान, पार्किंग अशी व्यवस्था असून, हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परिषदेतील उसाचा दर आणि आंदोलनाच्या निर्णयाबाबत उत्सुकता आहे. याबाबत आज येथे पत्रकार परिषद झाली. 

विदर्भ आणि मराठवाड्यातून दहा हजार शेतकरी ऊस परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे यांनी सांगितले. सावकर मादनाईक म्हणाले, ""ऊस परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका, सभा घेतल्या आहेत. मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता यंदाची ऊस परिषद उच्चांकी गर्दीत होईल. यंदा उसाचे क्षेत्र, शिल्लक साखर, उत्पादन होणारी साखर, कारखान्यांचा खर्च व उसाचा उत्पादन खर्च याचा ताळमेळ घालून व्यवहार्य असाच दर मागितला जाणार आहे. ट्रॉलीवर 28 टक्के, तर मोटारींवर आठ टक्के जीएसटी लागू करून भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचे दाखवून दिले आहे. सरकारचे अनेक निर्णय हे शेतकरी हिताचे नाहीत. तीन वर्षे भाजपला पाठिंबा दिला. आता गाडण्यासाठी शेतकऱ्यांची ताकद एकवटत आहे.'' 

प्रचंड पोलिस बंदोबस्त 
ऊस परिषदेसाठी दरवर्षीप्रमाणे शनिवारी (ता. 28) दुपारी बारानंतर परिषद संपेपर्यंत कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, दसरा चौक, झेले चित्रमंदिर आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली असून, परिषदेवेळी अधिकारी आणि कर्मचारी अशा शंभर पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला जाईल.