शहापुरात आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरा, दिरास अटक

शहापुरात आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरा, दिरास अटक

इचलकरंजी - शहापूर (ता. हातकणंगले) येथील कारंडे मळ्यातील तरन्नुम फारुख मारुफ (वय २६) यांनी आज आत्महत्या केली. त्यामुळे तरन्नुमच्या माहेरचे लोक संतप्त झाले. त्यांनी पती फारुख कलीमुद्दीन मारुफ, सासरा कलीमुद्दीन मारुफ, दीर आसीफ मारुफ या तिघांना बेदम मारहाण करीत त्यांच्या घराची तोडफोड केली. सासरी झालेल्या छळामुळेच तरन्नुमने आत्महत्या केली, अशी फिर्याद तिचे वडील वडील इम्तियाज अहमद शमशुद्दीन अंगड (रा. बुधवार पेठ, अंगड गल्ली, मिरज) यांनी दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करून पती फारुख कलीमुद्दीन मारुफ, सासरा कलीमुद्दीन मारुफ, दीर आसीफ मारुफ या तिघांना अटक केली. रात्री उशिरा पोसासू आखाबो मारुफ, जाऊ आजादुन मारुफ, ओमाणी मारुफ (सर्व रा. मूळ गाव कुडची, रायबाग, सध्या रा. कारंडे मळा, चौथी गल्ली, शहापूर) यांनाही ताब्यात घेतले आहे. अधिक तपासासाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. या घटनेमुळे कारंडे मळ्यात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

फिर्यादीत म्हटले आहे, की इम्तियाज अंगड यांची मुलगी तरन्नुम हिचा विवाह मे २०१० मध्ये कलीमुद्दीन यांचा मुलगा फारुख याच्याशी मिरज येथे झाला. त्यांना फैजन व मुलगी माहीन अशी दोन अपत्ये आहेत. विवाहानंतर काही दिवसांत पतीसह सासरा, सासू, दीर व जावांनी संगनमत करून माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला. मुली सुखात राहू दे, या भावनेने मागणीप्रमाणे मुलीच्या सासरच्या मंडळींना पैसे देत होते. तरीदेखील सासरच्या मंडळींकडून पैशाची वारंवार मागणी होत होती आणि तिचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. आजही तसाच प्रकार घडला. तरन्नुमने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर तिचा छळ झाला. त्यातून तिने बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

त्यानंतर सासरच्या मंडळींनी तरन्नुमला हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तिच्या वडिलांना दिली. अंत्यविधीसाठी तिचा मृतदेह कुडची या मूळ गावी घेऊन जात आहे. तुम्ही शहापूरऐवजी तेथेच या, असा दूरध्वनीवरून निरोप दिला. अचानक असा निरोप येताच तरन्नुमच्या माहेरच्या मंडळींच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यामुळे त्यांनी कुडचीऐवजी त्वरित शहापूर येथे धाव घेतली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता तिचा गळ्याभोवती काळे व्रण दिसून आले. दोन्ही हातांवर नखाचे ओरखडे दिसून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केली नसून सासरच्या लोकांनी संगनमताने खून केला आहे, असा संशय व्यक्त केला. त्यांनी तिचा मृतदेह अंत्यविधीसाठी कुडचीला न नेता याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना दिली. 

पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, सहायक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख, पोलिस उपनिरीक्षक मेहबूब मुजावर, तानाजी गुरव, कमलसिंग रजपूत, राम पाटील, अमर पाटील, शब्बीर बोजगर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मरणोत्तर तपासणीसाठी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा शवविच्छेदन झाले.

पंधरा दिवसांपूर्वीच दुचाकी दिली....
तरन्नुमच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले, की वेळोवेळी पैसे, सोने व इतर मदत केली होती. पंधरा दिवसांपूर्वीच जावयाच्या हट्टासाठी त्याला नवीन दुचाकी घेऊन दिली होती. तरीदेखील तरन्नुमचा छळ सुरूच होता. तरन्नुमने आज माहेरहून आणखी मदत आणण्यास साफ नकार दिला. त्यानंतर पुढील प्रकार घडला.

दिवसभर मुले उपाशीच...
तरन्नुमचा मृतदेह हलविताना तिच्या दोन लहान मुलांना बाहेर आणताच गल्लीतील महिलांना गलबलून आले. दुपारपासून दोन्ही मुले उपाशीच होती. त्यांना शेजारच्या घरात तरन्नुमच्या माहेरच्यांनी रात्री सातच्या सुमारास पोटभर जेवू घातले. निरागस बालकांना पाहून नातेवाइकांसह गल्लीतील महिलांना अश्रू अनावर झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com