उदगाव दरोड्यातील संशयित सीपीआरमधून पळाला

उदगाव दरोड्यातील संशयित  सीपीआरमधून पळाला

कोल्हापूर -  उदगाव (जयसिंगपूर) येथील दरोडा व खून प्रकरणातील संशयिताने सीपीआरमधून पोलिसांना गुंगारा देत पलायन केले. विशाल ऊर्फ मुक्‍या भीमराव पवार (वय २३, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. तो न्यायालयीन कोठडीत होता. प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. बेडीतून सुटका करून तो पळाला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उदगाव (ता. शिरोळ) येथील बायपास रस्त्यावरील निकम मळ्यातील प्रीतम यांच्या घरात १३ सप्टेंबरला दरोडेखोरांनी प्रवेश करून त्यांची आई अरुणा निकम (वय ५५) यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. वडील बाबूराव निकम यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोकडसह सात लाख २२ हजारांचा ऐवज पळविला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा छडा लावताना संशयित आकाश नामदेव पवार ऊर्फ जाबाज उपकाऱ्या पवार (वय २०, रा. इंदिरानगर, तासगाव, सांगली), मैनेश झाजम्या पवार (वय ३५, इटकरे, ता. वाळवा), शेळक्‍या जुरब्या पवार (वय ४९, रा. समडोळी, ता. मिरज) आणि विशाल ऊर्फ मुक्‍या भीमराव पवार (वय २३, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) या चौघांना पकडून जयसिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. जयसिंगपूर पोलिसांनी विशाल ऊर्फ मुक्‍याला १८ सप्टेंबरला अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच दिवशी त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले होते. तेथे जयसिंगपूर पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. त्याची पोलिस कोठडी २६ सप्टेंबरला संपली. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी तात्पुरता डिस्चार्ज घेतला होता. न्यायालयाने त्याच्यासह चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

न्यायालय आदेशानुसार विशाल ऊर्फ मुक्‍याला बिंदू चौक सबजेलमध्ये पाठविले. त्यानंतर त्याची प्रकृती पुन्हा बिघडली. जयसिंगपूर पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन त्याला २८ सप्टेंबरला दुपारी सीपीआरमध्ये पुन्हा उपचारासाठी दाखल केले. येथील दूधगंगा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पुरुष शस्त्रक्रिया विभागातील युनिट नंबर एकच्या तिसऱ्या बेडवर त्याच्यावर उपचार सुरू होते. सुरक्षेसाठी तेथे जयसिंगपूर पोलिसांची नियुक्ती केली होती.

शनिवार (ता.३०) सुरक्षेसाठी सहायक फौजदार दिनकर कवाळे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन वायदंडे आणि होमगार्ड सूर्यवंशी (क्रमांक ८१८) हे तिघे बंदोबस्ताला होते. संशयित विशालने कॉटला अडकवलेल्या बेडीतून हात सोडवून घेऊन तेथून पळ काढला. सकाळी सहाच्या सुमारास सूर्यवंशी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी वायदंडे यांना विशाल कॉटवर नसल्याचे सांगितले. दोघांनी मुक्‍याची स्वच्छतागृह, सीपीआर परिसरात शोध घेतला. त्यानंतर त्याची माहिती सहायक फौजदार कवाळे यांना दिली. त्यांनी हा प्रकार जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील वरिष्ठांना सांगितला. त्यांनी कंट्रोलला याची माहिती दिली.

उदगाव दरोड्यातील संशयित पळून गेल्याचे समजताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिसांनी शहर, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानक, तावडे हॉटेल चौकात शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. सकाळी नऊच्या सुमारास वायंदडे यांनी ही माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. जयसिंगपूर पोलिस उपाधीक्षक रमेश सरवदे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात भेट दिली. तेथे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडून माहिती घेतली. तसेच पाहऱ्यासाठी असलेले पोलिस व होमगार्डकडे चौकशी केली. वायंदडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल ऊर्फ मुक्‍या पवारवर कलम २२४ प्रमाणे गुन्हा नोंद केला.

बेडीतून हात काढला...
विशाल पवारच्या हातात बेडी घालून ती कॉटला बांधली होती. शेजारी रुग्ण असल्याने तेथे पोलिसांना थांबता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हा उपाय केला होता. त्या बेडीतून विशालने हात सोडवून घेतला. त्यानंतर त्याने बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांची नजर चुकवून पहाटे चार ते सहा या वेळेत पलायन केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

मोबाईल चोरल्याची चर्चा
विशाल पवारने जाताना सीपीआरधील रुग्णाच्या नातेवाईकांचे मोबाईलही चोरून नेल्याची चर्चा सीपीआरमध्ये सुरू होती. याबाबतही पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडेही चौकशी सुरू केली. 

सीसीटीव्हीसह सुरक्षारक्षकांचा अभाव
दूधगंगा इमारतीत सीसीटीव्ही नाहीत. सीपीआर आवारातीलही सीसीटीव्ही बंद आहेत. येथे नेमलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे कर्मचारीही संपावर आहेत. त्यांची अडचण तपासात होत असल्याच्या तक्रारी पोलिसांनी केली.

असा दिला गुंगारा?
विशाल पवारवर वॉच ठेवण्याची जबाबादारी सहायक फौजदार दिनकर कवाळे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन वायदंडे आणि होमगार्ड सूर्यवंशी यांच्याकडे होती. रात्री कवाळे घरी गेले, तर वायदंडेंना डुलका लागल्यानंतर होमगार्ड सूर्यवंशीला हुलकावणी देत विशालने पलायन केल्याची चर्चा सीपीआर परिसरात सुरू होती. याचीही पोलिस खातरजमा करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे.

तपासासाठी पथके रवाना
विशाल पवारच्या शोधासाठी लक्ष्मीपुरी, जयसिंगपूरसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रवाना झाली आहेत. रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह नाकाबंदी व विशालच्या गावीही पथके पाठविल्याचे पोलिस उपाधीक्षक रमेश सरवदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com