पन्हाळगडावर नाकाबंदी करून कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पोलिस अधीक्षकांकडून पोलिस निरीक्षकांची कानउघाडणी; प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट

कोल्हापूर  - ऐतिहासिक पन्हाळगडावर यापूर्वी सुरू असणाऱ्या नाकाबंदीला ब्रेक का लागला आहे, याबाबत पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पन्हाळा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची कानउघाडणी केली. तातडीने नाकाबंदी करून येथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांचे वाहन चालविण्याचे परवाने, कागदपत्रे तपासा. हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करा. यासाठी व्हिडीओ कॅमेऱ्याचाही आधार घ्या. त्याचबरोबर प्रेमीयुगुलांच्या पालकांनाही बोलावून समज द्या, अशा कडक सूचनाही त्यांनी केल्या. 

शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीच्या नावाखाली आज अनेक प्रेमीयुगुले सकाळी पन्हाळ्याच्या दिशेने मोटारसायकलवरून जाताना दिसतात. यापूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सातत्याने नाकाबंदी करून अशा प्रेमीयुगुलांवर वाहतूक नियमांचा भंग केल्याअंतर्गत कारवाईचा धडाका लावला होता. त्याची प्रेमीयुगुलांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा प्रेमीयुगुलांचा वावर पन्हाळगडावर वाढू लागला. पालकांच्या डोळ्यामागे सुरू असणारा हा प्रकार घातक ठरू शकतो. याची दखल खुद्द पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी आज घेतली. त्यांनी पन्हाळ्यावरील नाकाबंदीला का ब्रेक लागला आहे, याची विचारणा येथील पोलिस निरीक्षकांकडे केली. 

पन्हाळ्यावर तातडीने पूर्वीप्रमाणे नाकांबदी सुरू करा. प्रत्येक प्रेमीयुगुलांच्या वाहनांची कागदपत्रे तपासा, चालकांचे परवाने तपासा, हेल्मेट परिधान केले नसेल तर त्यांच्यावर वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दलची तातडीने कारवाई करा. शंकास्पद प्रेमीयुगुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून समज द्या. कारवाई करताना त्याचे चित्रीकरणही करा. कारवाईबाबतचा दररोजचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करा, अशा कडक सूचनाही मोहिते यांनी त्यांना दिल्या. 
 
हेल्मेटवर कारवाईच्या वेळा बदला
हायवेवर हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईच्या वेळा निश्‍चित आहेत. त्याचा अंदाज वाहनचालकांबरोबर प्रेमीयुगुलांनी घेतला आहे. येथून पुढे हेल्मेटवरील कारवाईबाबतच्या वेळा बदला, असे आदेशही पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिले.