शौचालयाच्या चौकटीला साडीचा अडोसा

डॅनिअल काळे 
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - टेंबलाईवाडी प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दारे मोडल्यामुळे महिला चौकटीला साडीचा आडोसा करुन शौचास बसतात. नगरसेवक म्हणून निवडून येऊन दोन वर्षे झाली. निधी नसल्याने कांही काम करता आले नाही. प्रशासन निधी देत नाही, त्यामुळे काम करता येत नाही. माता भगिनीची ही कुंचबणा पाहून शर्मेने मान खाली जाते. अशी हतबलता नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी महापालिकेत व्यक्त केली.

कोल्हापूर - टेंबलाईवाडी प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दारे मोडल्यामुळे महिला चौकटीला साडीचा आडोसा करुन शौचास बसतात. नगरसेवक म्हणून निवडून येऊन दोन वर्षे झाली. निधी नसल्याने कांही काम करता आले नाही. प्रशासन निधी देत नाही, त्यामुळे काम करता येत नाही. माता भगिनीची ही कुंचबणा पाहून शर्मेने मान खाली जाते. अशी हतबलता नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी महापालिकेत व्यक्त केली.

दुसरे कांहीही काम नको,पण शौचालयाला दारे बसवायला तरी निधी द्या,असे म्हणत श्री. भोपळे यांनी हातात कटोरा घेउन महापौर सौ.हसिना फरास आणि आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्यासमोर निधीसाठी हात पसरला. अत्यंत तळमळीने आणि पोटतिडकीने प्रश्‍न मांडणाऱ्या भोपळे यांच्यासमोर महापौर आणि आयुक्तही क्षणभर निरुत्तर झाले.पण भोपळे यांच्या या तळमळीसाठी अखंड सभागृहाने टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.

महापालिकेत काय गोठ्या खेळायच्या का?

कमलाकर भोपळे म्हणाले, मी शेजारच्या वडणगे गावातील व्यवसायाच्या निमित्ताने टेंबलाईवाडीत स्थायीक झालो. हाडाची काढे केली, रक्ताचे पाणी केले आणि या निवडणुकीत निवडून आलो . दोन वर्षे झाली निवडून येउन महापालिकेच्या कामकाजाची पध्दत पाहून कंटाळलो , आयुक्तांकडे फाईल घेउन आलो.आयुक्त म्हणाले, कामाचे फोटो काढा. पुन्हा फोटो घेउन फाईल घेउन गेला, तर समजुतीचा नकाशा करायला सांगीतला. समजुतीचा नकाशा घेऊन गेलो, तरी त्यांचे समाधान होईना, पुन्हा त्रुटीची यादी आली. दोन वर्षे हा नुसता ताकतुंबा,..ताकुतंबा ...ताकतुंबाच सुरु आहे. दोन वर्षात दोन आण्याचेही काम झाले नाही. सकाळी पाच वाजता प्रभागात फिरती करतो, नागरिक आता म्हणतात नुसतीच फिरती करता काम कांही होईना. महापालिकेत जाऊन गोट्या तरी खेळा. आता मला सांगा मी गोट्या कोणाबरोबर खेळू. प्रभागातील माताभगिनीना सार्वजनिक शौचालयाशिवाय दुसरा आधार नाही. त्या सार्वजनिक शौचालयात जातात. या शौचालयाची दारेच तुटली आहेत. ही दारे बसवायलाही निधी दिला जात नाहीत.नगरसेवक म्हणून निवडून येउन तरी आमचा काय उपयोग? नुसता ताकतुंबा सुरु आहे. त्यामुळे आता बास आता कोणतीच कामे करु नका, फक्त एकच काम करा..माझ्या माताभगिनीना सुरक्षीत शौचास जाता यावे, यासाठी किमान शौचालयाला दारे बसवायला तरी निधी द्या. असे म्हणत भोपळे यांनी महापौर आणि आयुक्तांसमोर निधीसाठी कठोराच पुढे केला. 

खासबाब म्हणून जादा निधी द्यावा

कोल्हापूर हे हागणदारीमुक्त असलेले राज्यातील पहिले शहर आहे. या शहरातही सार्वजनिक शौचालयांची किती दुरावस्था आहे. हे नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी मांडलेल्या प्रश्‍नावरुन आपल्या ध्यानात येते. टेंबलाईवाडी येथील हे उदाहरण प्रातिनिधीक आहे. शहरात बहुतांशी दाटवस्ती आणि झोपडपट्टी विभागात सार्वजनिक शौचालयांची ही अवस्था आहे. राज्यशासन आणि महापलिका यांनी हागणदारीमुक्त शहर असा नावलौकीक मिळविलेल्या शहराला तरी खासबाब म्हणून जादा निधी द्यावा,अशी मागणीही आता नागरिकांच्यातून होत आहे.