शुभेच्छापत्रे, चॉकलेट्‌स अन्‌ व्हॅलेंटाईन डे पार्टी..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

प्रेमाच्या या उत्सवासाठी आता केवळ तीनच दिवस उरले असून, यंदाही या उत्सवाला सामाजिकतेची झालर लाभणार आहे. रक्तदान शिबिरांबरोबरच ‘छूने से प्यार बढता है’ असा संदेश देत वंचित घटकांबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे. 

कोल्हापूर -  प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेसाठी आता बाजारपेठ सज्ज झाली आहे. प्रेमाच्या या उत्सवासाठी आता केवळ तीनच दिवस उरले असून, यंदाही या उत्सवाला सामाजिकतेची झालर लाभणार आहे. रक्तदान शिबिरांबरोबरच ‘छूने से प्यार बढता है’ असा संदेश देत वंचित घटकांबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे. 

चॉकलेट्‌सची क्रेझ
यंदाच्या व्हॅलेंटाईनला शुभेच्छापत्रांबरोबरच विविध फ्लेवर्सच्या चॉकलेटची झालर लाभणार आहे. विविध शॉपीज्‌मध्ये अशा फ्लेवर्समधील चॉकलेट उपलब्ध झाली आहेत. त्यात हॅंडमेड चॉकलेटसह इर्म्पोटेड चॉकलेटचा समावेश असून, चॉकलेटचे आकर्षक बॉक्‍स गिफ्ट म्हणून देण्यावर अनेक जण भर देणार आहेत. 

गिफ्ट आर्टिकलमध्ये प्रेमाचा संदेश असणारे कॉफी कप, फोटोफ्रेम; तसेच टेडीबेअरला अधिक मागणी आहे. म्युझिकल टेडीही बाजारात उपलब्ध असून तरुणाईला भुरळ घालत आहे. विशेषतः लाल-गुलाबी रंगाच्या गिफ्टस्‌ना यंदाही विशेष मागणी राहणार असल्याने त्यातील व्हरायटी उपलब्ध केली आहे. केवळ प्रियकर आणि प्रेयसीच नव्हे, तर आता नात्यातील प्रत्येकाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन साजरा करण्याची क्रेझ वाढली असून, शुभेच्छापत्रांपासून ते विविध गिफ्ट आर्टिकलवर त्याचा नक्कीच प्रभाव आहे. व्हॅलेंटाईन डे पार्टीचे आयोजन करण्यासाठी कॉलेज कॅम्पस सज्ज झाला असून, यंदा बुधवारी हा दिवस आल्याने कॅम्पसमध्ये या उत्सवाची धूम राहणार आहे. 

गुलाबाची फुले परदेशात
जगभरात साजऱ्या होणाऱ्या या प्रेमोत्सवासाठी जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणावर गुलाबाची फुले निर्यात होतात. यंदाही या गुलाबांना मोठी मागणी असून, निर्यातीसाठी फुलांच्या पॅकेजिंगचे काम वेगाने सुरू आहे.

कोणतं गिफ्ट देऊ?
व्हॅलेंटाईनला आपल्या प्रिय व्यक्तीसाठी नेमके काय करायचे, याचे प्लॅनिंग अगदी काही तासांपूर्वी करणाऱ्यांची संख्या साठ टक्‍क्‍यांहून अधिक आहे. मात्र त्यांची तारांबळ उडू नये, यासाठी ऑनलाईन मार्केटमध्ये ‘व्हॅलेंटाईनला कोणतं गिफ्ट देऊ’ अशा मथळ्याखाली हटके पद्धतीने व्हॅलेंटाईनला काय करता येईल, याची माहिती उपलब्ध केली आहे. आकर्षक आणि मनमोहक दागिन्यांपासून ते लाल रंगांच्या विविध गारमेंटस्‌पर्यंतच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध असून, त्यावर विविध ऑफर जाहीर केल्या आहेत.  

हॉटेल-रिसॉर्टही सज्ज
शहर आणि परिसरातील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टनी व्हॅलेंटाईन पार्टीचे आयोजन केले असून सोशल मीडियावरही व्हॅलेंटाईन डेची ‘गुलाबी’ धूम सुरू झाली आहे. अनेकांनी या दिवशी ‘एंगेजमेंट’चा मुहूर्त साधण्यावर भर दिला आहे.

Web Title: Kolhapur News Valentine Day festival