मलेशियातून तरुणांना परत आणण्यासाठी ज्ञानेश्‍वर मुळेंचे प्रयत्न 

मलेशियातून तरुणांना परत आणण्यासाठी ज्ञानेश्‍वर मुळेंचे प्रयत्न 

कोल्हापूर - मलेशियातील तुरुंगात असलेल्या तरुणांना देशात परत आणण्यासाठी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी "सकाळ' मधील बातमीची दखल घेतली आहे. त्यांनी आज मलेशियातील "हाय कमिशन'शी थेट संपर्क साधला. दिल्लीतील अधिकाऱ्यांनीही "डे टू डे' अपटेड घेण्याच्या सुचना दिल्या. तरुणांच्या सुटकेसाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. ""त्यांची सुटका झाल्याच्या आनंदाची बातमी सांगण्यास मला आवडेल,'' असेही त्यांनी आज सांगितले आहे. 

हॉटेलातील नोकरीसाठी मलेशियात गेलेल्या चार मराठी तरुणांना "वर्किंग व्हीसा' नसल्यामुळे तुरुंगात ठेवले आहे. त्यांना सोडविण्यासाठी मराठी माणसांनी पुढाकार घेतला आहे. "सकाळ'ने कोल्हापुरातून याचा पाठपुरवा सुरू केला आणि मंगळवेढा आणि अक्कलकोट (जि. सोलापूर), कर्जत (जि. नगर) आणि जळगाव-बेळगाव या परिसरातील एका तरुणाला मलेशियात अटक केल्याची बातमी दिली. तेथून पुढे त्यांना सोडविण्यासाठी मराठी माणूस एकवटला आहे.

व्हॉटस्‌ ऍप, ट्‌विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना तेथून सोडविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. "सकाळ'सह वाचकांनी ही माहिती दिल्लीतील परराष्ट्र विभागाला दिली. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना "सकाळ'मधील बातमी, सकाळ डिजिटलवरील व्हिडिओ पाठविले आहेत. मलेशियात तुरुंगात असलेल्या तरुणांची सविस्तर माहिती त्यांना पुरविली. त्यांनी याची दखल घेऊन आज मलेशियातील हाय-कमिशनशी थेट संपर्क साधला. तेथे त्यांनी तरुणांना सोडविण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच दिल्लीतील परराष्ट्र सचिव कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांचा "फॉलोअप' रोज घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या तरुणांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना देशात आणल्याची आनंदाची बातमी देण्यास मला आवडेल, असेही त्यांनी सांगितले आहे. 

"सकाळ'च्या वाचकांनी दिलेले योगदान व "सकाळ'मुळे आज मंगळवेढा, अक्कलकोट, कऱ्हाड, जळगाव, नगर, सांगली, दिल्ली ते मलेशिया असा पाठपुरावा झाला आहे. सांगलीतील पोलिस पुत्र असलेल्या कौस्तूभ पवारवर गुन्हा दाखल झाला. त्याने या तरुणांना मलेशियात "वर्किंग व्हीसा' न देता पाठविले. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. 

दरम्यान सध्या मलेशियातील तुरुंगात असलेल्या मोहन शिंदेचे वडील अशोक यांनी सांगलीत येऊन कौस्तुभ पवारच्या घरी ठिय्या दिला. तेथेच आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 
कौस्तुभ पवार फरार असल्याचे सांगून पोलिस त्याला अद्याप अटक करीत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मलेशियात महाराष्ट्रातील तरुणांची फसवणूक होत असल्याची बातमी सकाळ आणि सोशल मीडियावर फिरत असल्यामुळे मलेशियात याच टोळीच्या माध्यमातून जाणारे तिघे तरुण आज विमानतळावरून परत आले आहेत. 

मलेशियातील तुरुंगात असेलल्या महाराष्ट्रातील तरुणांची माहिती 
केस नंबर डब्ल्यू ए -62, पीटी.-1613-11/2017 - गुन्हा गुन्हा सेक्‍शन 6 (1), इम्मॅग्रेशन ऍक्‍ट (मलेशियात अनधीकृत प्रवेश ) 
1) गुरुनाथ इरान्ना कुंभार (रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि.सोलापूर) कारागृहातील नं. 3-17-09016 
2) दीपक लिंबाजी माने (रा.मानेवाडी,हुन्नुर,ता.मंगळवेढा.जि.सोलापूर) कारागृहातील नं.3-17-09010 
3) समाधान धनगर - कारागृहातील नं. कैदी नं. 3-17-09011 
4) मोहन अशोक शिंदे (रा.कर्जत, जि.नगर) कारागृहातील नंबर3-17-09000 

तीनच दिवस...
12 डिसेंबरला चारही तरुणांना न्यायालयात हजर केले जाईल. तेथे त्यांचा फैसला होण्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता.11) मलेशियात सुटी असते. त्यामुळे आपल्याकडे केवळ शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीनच दिवस आहेत. दरम्यान भारतात शनिवार, रविवार सुटी आहे. त्यामुळे तरुणांच्या सुटकेचा पाठपुराव्यास कमी पडता कामा नये, अशीही व्यवस्था दिल्लीतील परराष्ट्र सचिव कार्यालयाकडून सुरू आहेत. 

संबंधीत बातम्या..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com