गळती लाईनला नव्हे, यंत्रणेलाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

कोल्हापूर - एखाद्या पाईपलाईनला तीस वर्षे गळती आहे, असे कुणी सांगितले तर त्यावर कुणाचा विश्‍वासही बसणार नाही. इतके महापौर, आयुक्त, जल अभियंता, नगरसेवक होऊन गेले; पण आतापर्यंत ही गळती दिसली कशी नाही, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. 

कोल्हापूर - एखाद्या पाईपलाईनला तीस वर्षे गळती आहे, असे कुणी सांगितले तर त्यावर कुणाचा विश्‍वासही बसणार नाही. इतके महापौर, आयुक्त, जल अभियंता, नगरसेवक होऊन गेले; पण आतापर्यंत ही गळती दिसली कशी नाही, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. 

राजारामपुरीत (नऊ नंबर शाळा) पाईपलाईनला गळती आहे. दररोज सुमारे पंधरा लाख लिटर पाणी वाया जाते. एका बाजूला पाणी कमी पडत असल्याची तक्रार आणि दुसऱ्या बाजूला गळतीच्या रूपाने ‘फिल्टर’ केलेले पाणी वाया जाते. लकी बाजारसमोरील परिसर गल्लीत दीड ते दोन किलोमीटर अंतर आहे. पाईपलाईनच्या जोडातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. तीस वर्षांत पाईपलाईनची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. ज्या-त्या वेळी काम झाले असते तर आज १५ लाख लिटर पाणी वाया गेले नसते.

गळती पाईपलाईनला नव्हे तर पाणीपुवठ्याच्या यंत्रणेलाच लागल्याची या निमित्ताने स्पष्ट होते. ओरड झाल्यानंतर चारशे मीटर अंतराची पाईपलाईन बदलली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. कामासाठी निविदा काढली, त्यालाही प्रतिसाद नाही. आता दुसऱ्यांदा निविदा भरण्याचे आवाहन केले आहे. निविदा भरणार, नंतर ती उघडणार, तोपर्यंत पावसाळा तोंडावर आला, अशा परिस्थितीत वाया जाणारे पाणी थांबणार नाही. ‘आयआरबी’ने रस्त्यांचे काम करताना पाईपलाईनला धक्का लागला असेल का? असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. वीस-तीस वर्षांपूर्वी गळतीचे प्रमाण इतके नसेलही. मात्र त्या वेळी गळती निघाली असती, तर इतक्‍या प्रमाणावर पाणी वाहून गेले नसते.

१७ लाख पाण्यात
घरगुती वापरासाठी साडेनऊ रुपये (प्रति हजार लिटर) असा दर आहे. अर्धा इंची कनेक्‍शनमधून पाणीपुरवठा होतो, असे गृहीत धरले तर वाया जाणाऱ्या पाण्याचे दोन महिन्यांचे बिल सुमारे १७ लाख रुपये होते. पाणी वाया गेले नसते तर १७ लाखांची पाणीपट्टी वसूल झाली असती. गळतीमुळे हे १७ लाख पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Kolhapur News water leakage issue