कोल्हापूर शहरात खासगी दूध डेअरींचे ‘दुधात पाणी’...

कोल्हापूर शहरात खासगी दूध डेअरींचे ‘दुधात पाणी’...

कोल्हापूर - शहरातील काही खासगी दूध डेअरीतून विक्री होणाऱ्या दुधात पाणी असल्याचे स्पष्ट होते. अन्न, औषध प्रशासन विभागाने राबविलेल्या तपासणी मोहिमेनंतर हा निष्कर्ष हाती आला. कमी फॅटच्या दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. अन्न-औषध विभागाने या डेअरींतील दुधाचे बारा नमुने तपासले. त्यांत दोष असल्याचे आढळून आले.

म्हशीच्या दुधाची प्रतवारी (फॅट) सहा टक्‍क्‍यांपर्यंत असणे आवश्‍यक आहे. प्रतवारी साडेपाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. फॅट तसेच एफएनबी (घनपदार्थ) अशा दोन्ही चाचण्यांत नमुने कमी प्रतीचे ठरले. दूध विक्री केंद्रचालकांची पहाटेपासून धावपळ सुरू होते. शहरातील लोकांचे कधी एकदा दुधाची पिशवी हाती पडते, याकडेच लक्ष असते. खासगी दूध संघ आणि पारंपरिक गवळी अशा दोन्ही माध्यमांतून दुधाची विक्री होते. दूध पॅकबंद मिळू लागले, तशी गवळी बांधवांकडून दूध घेणाऱ्यांची संख्या कमी झाली; मात्र आजही काही लोकांचा पारंपरिक दूध व्यवसायावर विश्‍वास आहे.

खासगी डेअरींतून मोठ्या प्रमाणावर दुधाची विक्री होते. राज्य शासनाने मध्यंतरी सरसकट दूध डेअरींतील नमुने घेण्याचे आदेश अन्न, औषध प्रशासनाला दिले. त्यानुसार कोल्हापूर शहरासह लगतच्या परिसरातही दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले. 

खासगी संकलनावरच भेसळ
छोट्या डेअरी, विविध उपपदार्थ तयार करणारे छोटे व्यावसायिक यांच्याकडून दुधात भेसळ केली जाते. दुधाच्या सीलबंद पिशव्यांतून काही दूध बाहेर काढायचे आणि तेवढेच पाणी मिसळून पुन्हा पिशवी पॅक करायची, संपूर्ण पिशवीच फोडून त्यातील दूध एकत्र करायचे व त्यात पाणी मिसळून पुन्हा ते पॅक करायचे अशा पद्धतीने ही भेसळ होते. कोल्हापूर आणि परिसरात या भेसळीचे प्रमाण कमी असले तरी या विभागाने दुर्लक्ष केले तर भविष्यात त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

त्याचे निष्कर्ष हाती आल्यानंतर कमी प्रतीचे दूध ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचे स्पष्ट झाले. लिटरमागे डेअरीचा मालक सांगेल त्याप्रमाणे पैसे मोजायचे आणि त्याच्या पदरी असे दूध पडत असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले. ज्यांचे नमुने दोषयुक्त आढळले, अशांना दोन लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारवाईनंतरही कमी प्रतीच्या दुधाची विक्री होणार नाही, हे कशावरून अशी विचारणा ग्राहकांतून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com