नाव कोणाचे, यावर ठरणार सत्तेची गणिते 

नाव कोणाचे, यावर ठरणार सत्तेची गणिते 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव येते, यावर सगळी सत्तेची चक्रे फिरण्याची शक्‍यता आहे. घराणेशाही जपण्यासाठी नेत्यांनी आपल्या वारसांच्या नावाचा विचार केल्यास प्रत्येक नेता पुन्हा सोयीच्या राजकारणाचा "गेम' खेळण्याची शक्‍यता आहे. याशिवाय जिल्ह्यातील नेत्यांना आपला मतदारसंघ सांभाळण्याचा असल्याने सगळ्यांनीच आता "आळी मिळी चूप' अशी भूमिका घेतली आहे. 

शिवसेनेची दहा मते निर्णायक मानली जात आहेत, तसेच राज्यातील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची स्थिती पाहता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना अशी सोयीची आघाडी झाल्याचे दिसत असल्याने या ठिकाणीही अध्यक्ष निवडीत काय भूमिका असणार याचा निर्णय आज "मातोश्री'वरून होण्याची शक्‍यता आहे. मातोश्रीवरून आदेश जरी आला तरी अनेकांनी गटतटाचे राजकारण खेळत आपल्या स्थानिक आघाड्यांवर उमेदवार निवडून आणल्याने ते ऐनवेळी पलटीही घेण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कॉंग्रेसमध्ये माजी आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील हे सत्तेसाठी प्रयत्न करत असले तरी त्यांच्यामध्येही सुप्त संघर्ष सुरू आहे. दोघांच्या कोणत्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालायची, यावरून मतभेद सुरू आहेच. पी. एन. पाटील यांनी आपला मुलगा राहुल पाटील याला अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्यात येत असल्याचे संदेश कालपासून सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा घराणेशाही घ्यायची का, असा प्रश्‍न मनात तयार होत आहे. तसेच आमदार सतेज पाटील हे त्यांच्यासाठी कितपत प्रयत्न करतील, हा प्रश्‍न ही उपस्थित होत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी विरोधी आघाडीतील काही जणांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेला आपल्या बरोबर कसे घ्यायचे, हे आमदार सतेज पाटील यांना महापालिकेच्या राजकारणामुळे चांगले माहीत आहे. त्यांनी सर्जिकल स्ट्राइक करत महापालिकेत शिवसेनेला बरोबर घेऊन भाजप-ताराराणी आघाडीला रोखले होते. त्यामुळे सध्या त्यांनी ही सर्व फिल्डिंग लावली असून त्यांनी विशेषतः आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे असलेल्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव जाहीर करणार, त्यावर त्यांच्या सत्तेची गणिते अवलंबून असणार आहेत. राहुल पाटील यांचे नाव पुढे आल्यास माजी आमदार प्रकाश आवाडे, कॉंग्रेसमधील नाराज गट यांची साथ मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचे दिसते. शिवसेना कॉंग्रेसबरोबर गेल्यास आमदार चंद्रदीप नरके यांचा राहुल पाटील यांच्या नावास विरोध होण्याची शक्‍यता आहे. 

भाजपकडून शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आल्यास त्यावरून घराणेशाहीचा आरोप होऊन नाराज गट दुसरीकडे जाण्याची शक्‍यता आहे. भाजप, ताराराणी आघाडी, जनसुराज्य आघाडी यांची युती झाली तरी चंदगडमधून नंदाताई बाभुळकर नात्यागोत्याच्या राजकारणामुळे महाडिक यांच्यामागे येण्याची शक्‍यता आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक-आवाडे यांनी एकत्रित भूमिका बजावली आणि हातकणंगलेमध्ये आवाळेंना रोखले होते. त्यामुळे महाडिक यांच्यामागे आवाडे येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; परंतु शिवसेनेचा विचार केल्यास जनसुराज्यचे विनय कोरे भाजपबरोबर असल्याने आमदार सत्यजित पाटील हे भाजपबरोबर येण्याची शक्‍यता कमी असल्याने त्याचा फायदा कॉंग्रेस उठवण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेची एकूणच भूमिका भाजपला रोखण्यासाठीची दिसत असली तरी त्यांच्यामध्येही दोन मतप्रवाह आहेत. एक गट भाजपबरोबर जाण्यास इच्छुक असून दुसऱ्या गटाने कॉंग्रेसबरोबर बोलणी सुरू केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी सोयीची भूमिका पहिल्यापासूनच ठेवली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाऐवजी आघाडीचे चिन्ह, अशी सोयीची भूमिका ठेवून निवडणूक लढवल्यामुळे प्रत्येक आमदार आपला विधानसभा मतदारसंघ आणि आपला गट वाचविण्यासाठी थेट विचार करत आहे. 

सोयीची भूमिका 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी नाव कोणाचे येते, यावर कॉंग्रेस व भाजपला सत्तेसाठीची हालचाल करणे सोयीचे होणार आहे. तसेच शिवसेना मातोश्रीच्या आदेशाची वाट पाहत आहे; परंतु राज्यातील स्थिती पाहता सोयीची भूमिका घेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर शिवसेना जाईल, असे चित्र तयार होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com