गळा आवळल्यानेच मुलीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला. तिच्या अंगावर 25 जखमा होत्या आणि छातीच्या बरगड्या मोडल्या होत्या, अशी साक्ष मृतदेहाचे विच्छेदन करणारे कर्जत येथील वैद्यकीय अधिकारी दयानंद पवार यांनी आज न्यायालयात दिली. 

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला. तिच्या अंगावर 25 जखमा होत्या आणि छातीच्या बरगड्या मोडल्या होत्या, अशी साक्ष मृतदेहाचे विच्छेदन करणारे कर्जत येथील वैद्यकीय अधिकारी दयानंद पवार यांनी आज न्यायालयात दिली. 

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर आज सुरू झाली. ती तीन दिवस चालणार आहे. आज न्यायालयासमोर तिघांची साक्ष घेण्यात आली. डॉ. पवार यांची राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी सरतपासणी घेतली. त्यात ते म्हणाले, ""14 जुलै 2016 रोजी सकाळी सव्वानऊ वाजता पीडित मुलीच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यास मी व डॉ. सुचित्रा यादव यांनी सुरवात केली. शवविच्छेदन करीत असताना पीडित मुलीच्या अंगावर तब्बल 25 जखमा आढळल्या. त्यातील सहा जखमा गळा दाबल्यामुळे झाल्या होत्या. मुलीच्या छातीवर अनेक ठिकाणी चावे घेतले होते. दातांच्या जखमा खोलवर होत्या. गुप्तांगावरही जखमा होत्या. अत्याचाराच्या खुणा अंगावर होत्या. नाक व कानातून रक्त येत होते. दोन्ही खांदे निखळले होते. बरगड्या मोडलेल्या होत्या. गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हाताची नखे काळी-निळी पडली होती. चोवीस तासांच्या आत तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट दिसत होते.'' 

पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले, तेव्हा त्याने बलात्कार केल्याची कबुली दिली. तसे त्याच्या वैद्यकीय तपासणीतही दिसून आले. मात्र, आरोपीच्या अंगावर कोठेही जखमा नव्हत्या. कारण, पीडित मुलगी आणि आरोपी यांच्या वय व उंचीमध्ये मोठी तफावत होती. त्यामुळे मुलीला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नसावी. 

त्यानंतर पंच श्रीकांत दातीर यांची साक्ष झाली. ते म्हणाले, ""आरोपीचे कपडे माझ्यासमोर पोलिसांनी जप्त केले. कपड्यांवर रक्ताचे डाग होते.'' साक्षीदार महादेव ढगे यांनी सांगितले, ""पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा माझ्यासमोर केला. मुलीच्या नातेवाइकाने घटनास्थळ दाखविले. घटनास्थळावर चप्पल बघितली. तेथून आठ ते दहा वस्तू जप्त केल्या. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी आल्यानंतर दहा वस्तू जप्त केल्या. आरोपीतर्फे ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. प्रकाश आहेर यांनी उलटतपासणी घेतली. 

ऍड. खोपडे यांचा अर्ज 
आरोपी संतोष भवाळ याचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी न्यायालयात आज पुन्हा एक अर्ज केला. तसेच, सकल मराठा समाजाच्या निवेदनाच्या प्रती, त्या काळामध्ये आलेल्या प्रसारमाध्यमांमधील बातम्या, एक सीडी न्यायालयात सादर केली.

Web Title: kopardi case nagar