श्रमदानातून उचलला दहा टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातर्फे आज मध्यवर्ती बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यापीठस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिरातील तीनशेहून अधिक संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. आज मोहिमेअंतर्गत सुमारे दहा टन कचऱ्याचा उठाव केला.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आठ वाजता अभियानास प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत मध्यवर्ती बसस्थानकातील संपूर्ण परिसरासह वटेश्‍विर मंदिर परिसर, परीख पूल या ठिकाणांची स्वच्छता केली. घनकचरा, काटेरी झुडपे, प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या व काचा विद्यार्थ्यांनी गोळा केल्या. सुमारे तीन तास राबविलेल्या मोहिमेत बसस्थानकाच्या आतील व बाहेरील परिसरातील सुमारे दहा टन कचरा गोळा केला. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तानाजी पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे 20 सफाई कर्मचारीही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. पालिकेच्या वतीने 1 डंपर, 2 घंटागाडी आदी सामग्रीची उपलब्ध केली. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून झाडू, विळे, टोपल्या, पोती, हातमोजे आदींची उपलब्धता करण्यात आली. या वेळी मध्यवर्ती बसस्थानकप्रमुख अभय कदम यांच्यासह मध्यवर्ती बस स्थानकातील सुरक्षाप्रमुख आय. एच. मुजावर, वाहतूक नियंत्रक आय. आय. सांगावकर, बी. के. वग्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कुलगुरू डॉ. शिंदे यांचे चिरंजीव शंतनू यांनीही सहभाग घेतला. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, बीसीयूडीचे संचालक डॉ. डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस. एम. कुबल, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही गुरव, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड आदींनी अभियानात सहभाग घेतला.

आज महालक्ष्मी मंदिर परिसर
या स्वच्छता मोहिमेत उद्या (ता. 22) सकाळी आठ ते अकरा या कालावधीत महालक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.