सीईओअभावी स्मार्ट सिटी ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

‘सीईओ’ची तातडीने नियुक्ती करावी, यासाठी शासनाकडे पत्र पाठविले आहे. उपायुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या नावाची शिफारसही केली आहे. मात्र, शासनाने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
- विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त

निविदा सीलबंद; नियुक्तीसाठी पाठपुराव्याची आहे गरज
सोलापूर - स्मार्ट सोलापूर डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने प्रकल्पाची प्रक्रिया थांबली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या निविदा अद्याप सीलबंद आहेत. ‘सीईओ’ नियुक्तीसाठी महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या स्तरावर पाठपुरावा न झाल्यास योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तत्कालीन सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांची नियुक्ती झाली होती. गेल्या महिन्यात त्यांची बदली पाचगणीला झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दरम्यान, कंपनीचे नूतन चेअरमन तथा मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर १० जून रोजी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. त्या वेळी ‘सीईओ’ नियुक्तीची कार्यवाही लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यास आता एक महिना होऊन गेला, मात्र अद्यापही ‘सीईओ’ची नियुक्ती न झाल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम थांबले आहे.

पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी २८३ कोटी रुपयांचा निधी आला आहे. लवकरच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी सल्लागार कंपनीच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी आठ जणांनी काम करण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ जून रोजी योजनेचे उद्‌घाटनही झाले. सोलापुरात करावयाच्या कामांचे भूमिपूजन झाले. मात्र अद्यापपर्यंत ‘सीईओ’ची नियुक्ती झालेली नाही. दाखल झालेल्या निविदा उघडण्याचा अधिकार फक्त ‘सीईओं’ना आहे. त्यामुळे निविदाही उघडण्यात अडचण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.