धावपटू ललिता बाबरचा शाही विवाह!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

साताऱ्यातील यशोदा टेक्‍निकल इन्स्टिट्यूटच्या मैदानावर शाही मंडप उभारण्यात आला होता. खूप गर्दी होणार हे लक्षात घेऊन सकाळपासूनच नागरिक मंडपात येत होते. सर्वत्र स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.

सातारा : सनई चौघड्याच्या सुरांच्या साथीत आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत धावपटू ललिता बाबर व आयआरएस अधिकारी संदीप भोसले हे दोघे विवाहबद्ध झाले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय, क्रीडा, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

साताऱ्यातील यशोदा टेक्‍निकल इन्स्टिट्यूटच्या मैदानावर शाही मंडप उभारण्यात आला होता. खूप गर्दी होणार हे लक्षात घेऊन सकाळपासूनच नागरिक मंडपात येत होते. सर्वत्र स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. विवाहाचे व्यासपीठ फुलांनी सजविण्यात आले होते. विवाह मंडपाला एखाद्या महालासारखे रूप देण्यात आले होते. वर संदीप भोसले हे घोड्यावरून तर वधू ललिता बाबर या मेण्यातून मंडपात आले. अडीचच्या सुमारास विवाह विधींना प्रारंभ झाला. 

वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोकणचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आयकर विभागाचे सहआयुक्त नितीन वाघमोडे, खानापूरचे आमदार अनिल बाबर, माणचे आमदार जयकुमार गोरे, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी अध्यक्ष सुभाष नरळे, ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिल सुमारेवाला, आदी उपस्थित होते.