माझे टार्गेट वेगळे... मला गुलाल लावू नका - महादेवराव महाडिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवणे हे माझे ध्येय नाही. माझे ‘टार्गेट’ वेगळेच आहे, असे म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कार्यकर्त्यांकडून गुलाल लावून घेण्याचे टाळले. महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून विजयी झाल्यानंतर कसबा बावडा येथील राजाराम सहकारी कारखान्याच्या कार्यालयात बसलेल्या महादेवराव महाडिक यांची कार्यकर्ते भेट घेत होते. या वेळी त्यांनी दूरध्वनीवरून येणाऱ्या शुभेच्छांसह भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांशी आनंदाने चर्चा केली; पण गुलाल लावून घेतला नाही.

या वेळी महाडिक म्हणाले, ‘‘विरोधकांचे डोळे पांढरे झाले आहेत. कोणी कितीही खेळी केली तरी त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. ३७ मतं कुठे आणि २८ मतं कुठे याचा विरोधकांनी हिशेब लावावा. माझे टार्गेट सुनेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यापर्यंत नाही. ते तर मिळणारच होते; पण माझे टार्गेट वेगळे आहे. त्यामुळे आताच गुलाल लावणार नाही.’’ 

यामुळे ते कार्यकर्त्यांना ‘मला गुलाल लावू नका,’ असे प्रेमाने तर कधी रागाने सांगत होते. माजी आमदार पी. एन. पाटील यांची तुम्हाला समजूत काढावी लागणार का? असे विचारले असता महादेवराव महाडिक म्हणाले, ‘‘माझी स्नुषा अध्यक्षपदाची दावेदार असताना राहुल पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी मी प्रयत्न करूच शकत नव्हतो. पी. एन. यांची मी समजूत कशी काय काढू शकतो? हा निर्णय ज्याचा त्याचा होता.’’ कधीही जो पाप करतो, त्यानेच प्रायश्‍चित्त घ्यायचे असते, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा शौमिका महाडिक व आमदार अमल महाडिक यांनी महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी खासदार धनंजय महाडिक, स्वरूप महाडिक, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, पृथ्वीराज महाडिक उपस्थित होते. 

कुऱ्हाडे यांच्याकडून अभिनंदन
काँग्रेस उमेदवाराला पराभूत करून भाजपने सत्ता मिळविल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस सुरेश कुऱ्हाडे यांनी महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तर मावळत्या अध्यक्षा विमल पाटील यांचे पती कुंडलिक पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनीही महाडिक यांची भेट घेतली. 
 
अध्यक्षांचे दंडवत
निवडीनंतर शौमिका व आमदार अमल महाडिक यांनी महादेवराव महाडिक यांची राजाराम कारखान्यावर भेट घेतली. या वेळी नूतन अध्यक्षा शौमिका यांच्यासह आमदार अमल महाडिक या उभयतांनी महादेवराव महाडिक यांच्या पायांवर डोके ठेवून दंडवत घालून आशीर्वाद घेतले.

Web Title: mahadevrao mahadik talking