महालक्ष्मी मंदिरावर पिंपळ, वटवृक्ष 

सुनील पाटील - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 14 मार्च 2017

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरावर उगवलेले गवत, पिंपळाची व वडाची झाडे वाढतच आहेत. एकीकडे महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा राबवून मंदिराचे मजबुतीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार आहे; तर दुसरीकडे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सूचना देऊनही मंदिरावरील झाडे काढली जात नाहीत, ही बाब खेदाची आहे. 

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरावर उगवलेले गवत, पिंपळाची व वडाची झाडे वाढतच आहेत. एकीकडे महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा राबवून मंदिराचे मजबुतीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार आहे; तर दुसरीकडे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सूचना देऊनही मंदिरावरील झाडे काढली जात नाहीत, ही बाब खेदाची आहे. 

मंदिरावर वाढलेल्या झाडांची मुळे बांधकामातील फटी मोठ्या करून मूळ बांधकामाला बाधा ठरत आहेत. गेल्या महिन्यात महालक्ष्मी मंदिराची पाहणी करायला आलेल्या विभागीय आयुक्तांनी ही झाडे तत्काळ काढून घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना आदेश दिले होते. या वेळी मात्र झाडे काढून घेण्याबाबत सकारात्मकता दाखविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांनी जसे कोल्हापूर सोडले, तसे त्यांचा आदेशाची अमलबजावणी करण्याचेही सोडून दिले. याकडे दुर्लक्ष केले आहे. 

देवस्थान समितीकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. देवस्थान समितीवर सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी अतिउत्साह दाखविला जातो. पण मंदिराची प्राथमिक डागडुजी करताना समितीकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. मंदिराच्या मुख्य शिखरासह घाटी दरवाजा, दर्शन मंडपासह इतर ठिकाणी पिंपळाची व वटवृक्षाची लहान-मोठी झाडांची मुळे रोवत आहेत. लहान आहेत, तोपर्यंतच त्यांना हटविली पाहिजेत, अन्यथा पावसाळ्यात पुन्हा या झाडांचे मोठे जाळे तयार होण्यास वेळ लागणार नाही. झाडे जसजशी वाढत आहेत, तसतसे मंदिराच्या सौंदर्यात बाधा येत आहे. 

भाविकांनी कळसाला हात जोडल्यानंतर पहिल्यांदा ही वाऱ्यावर डोलणारी झाडेच दिसतात. सध्या देशभरातून भाविक मंदिरात येत आहेत. त्यांच्यासमोर मंदिराचे हे रूप दिसणे कोल्हापूरच्या पर्यटनालाच योग्य नाही. 

जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी याबाबत तत्काळ निर्णय घेऊन मंदिरावर जी लहान-मोठी झाडे उभी राहत आहेत, त्यांना उखडण्यासाठी मोहीम राबवावी लागणार असल्याचे भाविकांचे मत आहे. 

आयुक्तांचा आदेश बेदखल 
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मंदिराची तब्बल दोन ते अडीच तास पाहणी केली. या वेळी इतर त्रुटींसह मंदिरावरील वाढलेली झाडांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण या वेळी लवकरच ही झाडी काढून टाकली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र हा आदेश बेदखल केल्याचे भावना व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Mahalakshmi temple Pipal, banyan tree