पुजारी हटावप्रश्‍नी अधिवेशनात आवाज उठवणार : बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

सदाभाऊ चुकलेच... 
कुणा नेत्याच्या आदेशाने नव्हे, तर शेतकऱ्यांनी यंदा स्वयंस्फूर्तीने राज्यव्यापी संप पुकारला. त्यातून मार्ग काढताना सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली असती तर त्यांना मंत्रिपदापेक्षाही आणखी मोठा मान शेतकऱ्यांनी दिला असता, असेही आमदार कडू म्हणाले. खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊंमध्ये मध्यस्थी करण्याएवढा मी मोठा नाही. मी कार्यकर्ता बच्चू म्हणूनच योग्य आहे असे सांगताना, तसेच विरोधी पक्षातल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर बोलताच येणार नाही, असेही ते म्हणाले. 

कोल्हापूर - श्री अंबाबाईचे "लक्ष्मीकरण' म्हणजे धर्मद्रोहच आहे. मंदिरातील पुजारी हटावप्रश्‍नी येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या प्रश्‍नी राज्य शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून एका महिन्यात संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याशिवाय पुजाऱ्यांच्या संपत्तीची माहिती घेऊन ती कुठून आली, याचाही लेखाजोखा मांडला गेला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 

श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या पाठिशी ठामपणे असल्याचे सांगून आमदार कडू म्हणाले, ""अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांबाबत सध्या आंदोलन तीव्र झाले आहे. मात्र, येत्या काळात इतरही धार्मिक देवस्थानांतील देणग्यांची रक्कम लोकहितासाठी वापरली जावी, यासाठी आंदोलन उभे करावे लागणार आहे. अंबाबाई मंदिरातील विविध प्रश्‍नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात शासनाने लक्ष घालून मार्ग काढला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.'' 

सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि सहकार मंत्री अजूनही अभ्यास करीत असून आता ते पाचवा शासन निर्णय लवकरच जाहीर करतील, असा आरोपही आमदार कडू यांनी या वेळी केला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला भाग पाडल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यासाठी दिल्ली गाठणार असल्याचेही कडू यांनी सांगितले. पुजारी हटाव संघर्ष समितीचे सदस्य डॉ. सुभाष देसाई, शरद तांबट, वसंतराव मुळीक, जयश्री चव्हाण, चारूलता चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. 