मल्लेवाडी सातारा जिल्ह्यात?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुख्यमंत्री फडणवीस यांची फेसबुक पोस्टमध्ये चूक
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर केलेल्या चुकीची नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मिरज तालुक्‍यातील मल्लेवाडी हे गाव सातारा जिल्ह्यात असल्याची पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली होती. नेटिझन्सनी त्याची खिल्ली उडवल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी (ता. 19) सातारा, सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. साताऱ्यातील कार्यक्रम उरकून ते सांगलीत आले. तेथून थेट मल्लेवाडी गावी गेले. तेथे जिल्हा पोलिसांनी डॉल्बीमुक्त उपक्रमातून पैसे वाचवून बांधलेल्या सुखकर्ता बंधाऱ्याचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. भरून वाहणाऱ्या बंधाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी सेल्फीही काढले. त्यानंतर हे फोटो त्यांनी फेसबुक पेजवर अपलोड केले. त्यात "सातारा जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील मल्लेवाडी गावी' असा उल्लेख केला.

यावर नेटिझन्सनी पटापट उड्या घेत त्यांची चूक दाखवून दिली. काहींनी या पोस्टची खिल्ली उडवली. चूक लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यात दुरुस्ती करत "सांगली जिल्ह्यातील' असा बदल केला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार डिजिटल होण्याचा प्रयत्न सर्वच मंत्री करताहेत. मुख्यमंत्री स्वतः सोशल मीडियावर सक्रिय आहेत. गडबडीत पोस्ट करताना अनेकदा चुका होतात, अशीच चूक काल त्यांच्या हातून झाली. नेटिझन्सनी मात्र ती पटकन पकडली.