मंडईत वजनांऐवजी दगडांचा वापर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सुट्या पैशांअभावी बोकांडी पडतो माल
दुसरे म्हणजे मंडईतील सगळे सुट्या पैशांतलेच व्यवहार. तुमच्याकडे सुटे पैसे नसतील, तर नको असतानाही तुमच्या पिशवीत सक्तीच्या आग्रहाने आणखी माल भरला जातो.

सातारा - आठवड्यातून एकदा तरी तुम्ही कांदे, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी आदी भाज्यांनी गच्च भरलेली पिशवी घेऊन मंडईतून बाहेर पडत असाल. मात्र, तुम्ही घेतलेल्या मालाचे वजन योग्य असल्याची तुमची खात्री फोल ठरली तर नवल वाटून घेऊ नका. कारण सध्या मंडईत अधिकृत वजनांऐवजी दगडांचा सर्रास वापर होत आहे. 

शहरातील पोवई नाका तसेच बाजार समितीसमोर भरणाऱ्या भाजी मंडईत प्रत्येक भाजीवाल्याबरोबर ग्राहक भावाची घासाघीस करून आपल्या पिशवीत कमी पैशात जादा भाजी भरण्यासाठी प्रयत्नशील असतात.

गुरुवारी (ता. १९) मंडईत नेहमीप्रमाणेच भरपूर गर्दी, गडबड, गजबज होती. भाज्यांवर मारलेले पाणी खालीही बरचे सांडले होते. जमिनीवर थोडा चिखलही होताच. खराब झालेल्या भाज्या खाली टाकलेल्या होत्या. तिथेच पोतीही पडलेली होती. शेतकऱ्यांचा बाजार असो अथवा भाजी मंडई, दोन्ही बाजूला ओळीने भाज्यांचे आणि फळांचे ढीग मांडून बसलेले आणि मधल्या रस्त्यातून वाट काढत, हातातल्या पिशव्या सांभाळत सांभाळत चालणारे, आठवड्याभराची भाजी घ्यायला आलेली अनेक गिऱ्हाईके पाहण्यास मिळाली. भाज्यांची निवड झाल्यानंतर ग्राहक अर्धा पावशेरपासून किलोपर्यंतच्या वजनात भाजी खरेदी करतात. मंडईतील काही ठिकाणी तागड्यातील वजने म्हणजे दगड वापरले जातात. तुम्ही जर संबंधितास विचारले तर दगडाचे वजन तेवढंच हाय, असे सांगितले जाते. भाजीच्या दरात घासाघीस केल्यामुळे तुम्ही निमूटपणे भाजी घेता. 

खरं तर या प्रकारामुळे तुमच्या पिशवीत येणारी भाजी ही कमी वजनाची आहे का, याची खात्री देखील तुम्हाला करावी वाटत नाही.

Web Title: mandai Weight stone use