मोर्चात चालतील मराठ्यांचे लाखो वाघ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - ‘साखर झोपेतल्या मावळ्यांना तुझ्या बलिदानाने आली जाग, बघ ना ताई, येत्या पंधरा तारखेला कोल्हापुरात चालतील, मराठ्यांचे लाखो वाघ’ अशा हृदयस्पर्शी संदेशाबरोबर पूर्वी तख्तासाठी लढलो, आता लढाई जातीसाठी आणि मातीसाठी, असे संदेश मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने दिले जात आहेत. पंधरा ऑक्‍टोबरच्या मोर्चासाठी तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला हा मोर्चा कशासाठी, त्याचे महत्त्व काय, याबाबत प्रबोधन सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. 

शहरात मोठ्यात मोठा डिजिटल बोर्ड लावण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांत चुरस लागली आहे. प्रमुख चौक, मंडळाचे कट्टे ‘मराठा’ या नावाने सजले आहेत. शिरोली जकात नाक्‍यावर कमान आहे, त्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांची भावमुद्रा असलेला ‘एक मराठा लाख मराठा’ असा फलक लक्षवेधी ठरत आहेत. ‘नका ठेवू नजरा जिजाऊंच्या लेकींवर, महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर’ अशी मनातील खदखद आणि संताप बाहेर काढणारा बोर्डावरील मजकूरही खूप काही सांगून जात आहे. रंकाळा स्टॅंड येथील गोल सर्कल मंडळाने वीस बाय शंभर फूट आकारातील भव्य असा डिजिटल बोर्ड उभारला आहे. त्यासाठी मंडळाच्या शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

मोर्चामागे आरक्षणासह महत्त्वाची मागणी आहे ती कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी देण्याची. राज्यात अन्य ठिकाणी मोर्चे झाले. त्यात मुलींनी भाषणे केली. त्यामागे कोपर्डी घटनेसंबंधीचा संताप अधिक होता. हाच धागा पकडून मावळ्यांना तुझ्या बलिदानाने आली जाग, बघ ना ताई तुझ्यासाठी चालतील मराठ्यांचे लाखो वाघ’ अशी भावनिक साद घालत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. 

व्हॉटस्‌ ॲपवर केवळ मोर्चाच
गावागावात फक्त एकच चर्चा, दमदार निघणार आहे कोल्हापुरातील मोर्चा. ‘ना आवाज, ना डरकाळी, भेटू पंधराला सकाळी’ असे संदेश देऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजाचे पदाधिकारी गावोगावी बैठका घेऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. गावातील पुढाऱ्यांनीच चारचाकी वाहनांची व्यवस्था केली आहे. तरुण मंडळी मात्र दुचाकीवरून मोठ्या संख्येने पोचण्याच्या तयारीत आहेत. मोर्चाचा दिवस जसा जवळ येऊ लागला आहे तसा बॅनर, झेंडे, डिजिटल बोर्डच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आख्खी तरुण पिढी व्हॉटस्‌ ॲपवर असल्याने या माध्यमाचा प्रभावी वापर सुरू आहे.

Web Title: maratha kranti morcha in kolhapur